पुणे – खडकवासला आणि पानशेत हे दोन्ही धरण 100 टक्के भरल्यानंतर धरणसाखळीतील वरसगाव धरणदेखील 100 टक्के भरण्याच्या मार्गावर असून, सध्यस्थितीत या धरणात 93 टक्के पाणीसाठा आहे. सध्यस्थितीत चारही धरणांत मिळून 91 टक्के म्हणजे 26.52 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
यंदा पाऊस उशिरा दाखल झाल्याने जुलैच्या शेवटच्या आठवड्यात खडकवासला धरण भरले. त्यानंतर पानशेत धरण मागील आठवड्यात 100 टक्के भरले. मागील आठवड्यापासून धरण परिसरात अल्प असा पाऊस होत आहे. त्यामुळे पाण्याचा येवा कमी झाला आहे. आता पाणीपातळी स्थिर आहे. सद्यस्थितीत वरसगाव धरणात 92.15 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे हे धरणही लवकर भरेल, असा अंदाज पाटबंधारे विभागाकडून व्यक्त केला जात आहे.
पानशेत धरणातून पुन्हा विसर्ग
पानशेत धरण 100 टक्के भरल्याने धरणात जमा होणारे अतिरिक्त पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. धरणाच्या सांडव्यावरून 600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पानशेत धरणातून सोडण्यात येणारे पाणी खडकवासला धरणात जमा होते. त्यामुळे खडकवासला धरणातून कालव्याद्वारे 1000 क्युसेकने विसर्ग केला जात आहे.