नवी दिल्ली -माजी क्रिकेटपटू आणि कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी शनिवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. त्यावरून भाजपने सिद्धू यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. इम्रान यांच्या हस्ते कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्धाटन झाले.
त्या सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या सिद्धू यांनी इम्रान यांचे तोंडभरून कौतुक केले. सिकंदराने भय पसरवून जग जिंकले. मात्र, इम्रान यांनी संपूर्ण जगाचे मन जिंकले, असे सिद्धू यांनी म्हटले.
त्यावरून भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सिद्धू यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पाकिस्तान आणि इम्रान हे भारतापेक्षा उच्च स्थानी असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न सिद्धू यांनी केला. त्या सोहळ्यावेळी आपण 14 कोटी शीखांचे प्रतिनिधित्व करत असल्याचेही त्यांनी भासविले. त्यांना पाकिस्तानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते.
भारतातून गेलेल्या अधिकृत जथ्याचे ते भाग नव्हते, असा शाब्दिक टोला पात्रा यांनी लगावला. राजकारणात सक्रिय होण्याआधी सिद्धू आणि इम्रान या दोघांनीही क्रिकेटपटू म्हणून कारर्कीद गाजवली. त्यातून त्या दोघांची आधीपासूनच मैत्री आहे. ती सातत्याने जगजाहीर करण्यावरून सिद्धू नेहमीच भाजपच्या टीकेचे धनी ठरले आहेत.