पुणे- करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच कोविड लसींच्या भविष्यातील वाढणाऱ्या उत्पादनाचा विचार करून केंद्र सरकारने लसींच्या चाचण्यांना गती देण्यासाठी अतिरिक्त प्रयोगशाळा स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पुणे आणि हैदराबाद या शहरांची निवड करण्यात आली आहे. यामुळे लसींच्या चाचण्यांना गती तर मिळेलच, परंतु त्या बाजारात येण्यापूर्वी त्याचे प्रमाणपत्र आणि अन्य प्रक्रियाही वेगाने पूर्ण करता येणार आहेत.
भारतात मानवी शरीरासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधक औषधे तसेच इंजेक्शन्सना (लस आणि अँटिसेरा) प्रमाणपत्र देणारी एकच राष्ट्रीय औषध नियंत्रक प्रयोगशाळा कसौली येथे आहे.
पुण्यातील “एनसीसीएस’ (नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स) या संस्थेला आता करोना प्रतिबंधक लसीची चाचणी, करून त्याचा साठा बाजारात आणण्यासाठी केंद्रीय औषध प्रयोगशाळा म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे.
यासंदर्भातली राजपत्रित अधिसूचना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 28 जून 2021 रोजी जारी केली आहे. याशिवाय हैदराबादच्या “एनआयएबी’ संस्थेलाही ही सुविधा देणारी अधिसूचना लवकरच जारी होणार आहे.
पंतप्रधान निधीमधून मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या आधारावर या दोन्ही संस्थांनी अल्पावधीतच, अविरत प्रयत्न करून या कामासाठी अत्याधुनिक सुविधा आपल्या प्रयोगशाळेत उभारल्या आहेत. या सुविधेअंतर्गत, दर महिन्याला लसींच्या 60 तुकड्यांची (बॅच) चाचणी करणे शक्य होऊ शकेल.
करोना लसींच्या चाचण्यांना वेग मिळेल. यामुळे लसींचे उत्पादन आणि पुरवठा तर वाढेलच त्याशिवाय पुणे आणि हैदराबाद या शहरांतच ही सुविधा उपलब्ध झाल्याने चाचणी व दळणवळणाचा खर्च, वेळेचीही बचत होईल.