केंब्रिज विद्यापीठाचा दावा
लंडन – करोनावर लस शोधण्यासाठी अनेक देश सरसावलेले असतानाच केवळ करोनाच नाही तर सध्या जगात अस्तित्वात असलेल्या सर्वच विषाणूंवर प्रभावशाली ठरेल, अशी लस लवकरच उपलब्ध होणार असल्याचा दावा केंब्रिज विद्यापीठाने केला आहे.
वटवाघळांमुळेच मानवाला करोनाची बाधा झाल्याचे वर्तवले जात आहे. त्यातूनही काही संशोधन सुरू आहे. विद्यापीठाकडून डायओस-कोवॅक्स-2 असे नाव असलेली लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ही लस देण्यासाठी सुई न वापरता जेट इंजेक्शनच्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून लवकरच या लसीच्या मानवावर चाचण्या सुरू करण्यात येणार आहे. या लसीच्या संशोधनासाठी ब्रिटन सरकारने 19 लाख पौंडांचे अर्थसहाय्य दिले आहे.
तर डायोसिनवॅक्स कंपनी 4 लाख पौंड खर्च उचलणार आहे.
सिथेंटिक डीएनएचा वापर करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जास्त उपयोगी ठरेल. यातून विकसित झालेली लस प्रभावी ठरेल. तसेच कमी खर्चात ती उपलब्ध होईल, असेही विद्यापीठाने सांगितले आहे.