रांजणगाव गणपती (पुणे) – पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कंपन्यांना कामगारांची कुटुंबीयांसमवेत रॅपिड टेस्ट करण्याचे आदेश द्यावेत. हॉटस्पॉट गावात रॅपिड टेस्ट करण्यात यावी. कोविडसाठीची औषधे ताबडतोब उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा सोमवारपासून एमआयडीसी बंद करण्याचा इशारा भाजपाचे उद्योग आघाडीचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिला आहे.
पाचंगे म्हणाले, शिरूर तालुक्यात कोविड विषाणूचा फैलाव गंभीर होत चालला आहे. तरीही प्रशासन ठोस निर्णय घेत नाही. वारंवार लेखी तक्रार करुनही कंपन्यांतील कामगारांची व कुटुंबीयांची रॅपिड टेस्ट करण्याचे आदेश दिलेले नाहीत. याचा गंभीर परिणाम स्थानिक गोरगरिबांना बसत आहे. शासनाने औषधेही उपलब्ध करून दिलेली नाहीत. कंपन्यांमध्ये सर्रासपणे रेड झोनमधून अधिकारी वर्ग येत असून अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये समुहाने कोविड रुग्ण सापडत आहेत. पण त्याची माहिती लपविली जात असून त्याचा फटका स्थानिक कामगारांना बसत आहे. स्थानिक कामगारांना बळजबरीने कामावर येण्याचे बंधन घातले जात असून पॉझिटिव्ह आढळून आल्यावर स्वतः खर्च करण्याची वेळ येते. कंपन्या सुरू ठेवण्यास आमची काही हरकत नाही पण जे नियम सर्व सामान्य नागरिकांना आहेत, तेच नियम कंपन्यांनीही पाळणे आवश्यक आहे. कामगारांना कंपनीच्या आत कोणतीही सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या ही तक्रारी येत आहेत. तरीही प्रशासन कोणतीही ऍक्शन घेत नाही. कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले. त्यामुळे सोमवारपर्यंत कंपन्यांना असे आदेश देण्यात आले नाही तर नाइलाजाने शिरुर तालुक्यातील संपूर्ण कंपन्या बळजबरीने बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल.
त्याचबरोबर रांजणगाव एमआयडीसी मधे व्हेंटीलेटर हॉस्पिटल उभारण्याचे ही कंपन्यांना आदेश द्यावेत. शिरूरच्या सरकारी रुग्णालयात ताबडतोब कोविडसाठीची ससून रुग्णालयात उपलब्ध असणारी औषधेही उपलब्ध करून देण्यात यावीत व तालुक्यातील हॉटस्पॉट गावांमध्येही सर्रासपणे रॅपिड टेस्ट करण्यात यावी, असे निवेदन जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी शिरुर, पोलीस निरीक्षक रांजणगाव एमआयडीसी, पोलीस निरीक्षक शिक्रापूर, तालुका वैद्यकीय अधिकारी शिरूर यांना देण्यात आले आहे.