पुणे – गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे. त्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आमदार रवींद्र धंगेकर यांनी हिवाळी अधिवेशनादम्यान निदर्शने केली. यावेळी काँग्रेस पक्षाच्या व महाविकास आघाडीतील आमदारांनी पाठिंबा दर्शवला.
धंगेकर म्हणाले, गणेशोत्सव, दहीहंडी या उत्सवावरील निर्बंध आम्ही हटवले असून निर्बंधमुक्त वातावरणात सण साजरे करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. उत्सवकाळातील ५ दिवस रात्री उशिरापर्यंत ध्वनिवर्धक लावण्याची परवानगीही सरकारने दिली होती.
असे असताना या मंडळांच्या कार्यकर्त्यांवर वेगवेगळी कलमे लावून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे ही कारवाई पूर्णतः चुकीची आहे.
गुन्हे दखल करण्यात आलेल्यांमध्ये अनेक तरुण आहेत. त्यांच्यावर गुन्हे दखल केले तर त्यांना नोकरी मिळणार नाही. उच्च शिक्षणात त्यांना अडचणी येतील. सरकारने जाहीर केलेल्या नियमात राहून या तरुणांनी उत्सव साजरा केला आहे. त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे हे खोटे आहेत. ते त्वरित मागे घेण्यात यावेत, अशी आमची मागणी आहे, असे आमदार धंगेकर यांनी सांगितले.