लस घेतल्यामुळे पोलिसांची बेफिकिरी वाढली

सध्या उपचाराधीन करोनाबाधित पोलिसांची संख्या पोहोचली 65 वर


आत्तापर्यंत 666 पोलिसांना करोनाची बाधा

पिंपरी – लस घेतल्यामुळे पोलिसांची बेफिकीरी वाढली आहे. योग्य ती खबरदारी न घेतल्याने सध्या 65 पोलीस करोना बाधित झाले आहेत. तर आत्तापर्यंत 666 जणांना करोनाची बाधा झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे.

दोन महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस दल करोना मुक्‍त झाले होते. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पोलीस आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चिंता व्यक्‍त केली जात आहे.

मागील वर्षी मार्चमध्ये शहरात करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून पोलीस रस्त्यावर उतरून करोनाशी दोन हात करीत आहेत. दरम्यान, वर्षभरात शहरातील 666 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यातील 597 पोलीस आतापर्यंत करोनामुक्‍त झाले आहेत. तर, चार पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

आता पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या पोलीस दलात 65 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 11 रुग्णालयात दाखल असून 54 पोलीस गृहविलगीकरणात आहेत. लागण झालेल्या एकाही पोलिसाला करोनाची गंभीर लक्षणे नाहीत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे करोना सेलकडून सांगितले जात आहे.

डोस घेतल्यानंतरही लागण
शहरातील 85 टक्‍के पोलिसांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर, 60 टक्‍क्‍याहून अधिक जणांनी दुसरा डोस घेतला आहे. अद्यापही काहीजण करोनाचा डोस घेत आहेत. मात्र डोस घेतल्यानंतर पोलिसांची बेफिकीरी वाढली आहे. आपल्या सहकाऱ्यांमध्ये असताना किंवा आरोपीला सोबत घेऊन तपास करीत असताना काही पोलीस मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करीत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही पोलिसांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लसीकरण झाले असले तरी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

मोक्‍का आणि बेटिंगच्या आरोपींमुळेही पोलीस बाधित
मोक्‍काच्या आरोपीच्या संपर्कात आलेल्या पोलिसांनाही करोनाची लागण झाली. यामध्ये चिखली पोलीस ठाण्यातील सहा कर्मचारी आणि एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. तर काही दिवसांपूर्वी मामुर्डी, घोराडेश्‍वर डोंगर आणि विमाननगर, पुणे येथे पोलिसांनी एकाचवेळी छापा घालून 33 सट्टेबाजांना अटक केली. यातील सात आरोपींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे यापुढील काळात पोलिसांना अधिक सतर्क राहून काम करावे लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.