मिजवान (आझमगड)- उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यात प्रख्यात कवी-गीतकार कैफी आझमी यांचे पिढीजात गाव आतापर्यंत लाल पट्ट्यातील म्हणून समजले जात होते. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत फूलपूर पोवई मतदारसंघातील मिजवान या गावात भाजप विरुद्ध सपा अशी लढत बघायला मिळते आहे. ही लढतदेखील एकाच कुटुंबात होते आहे. भाजपचे आमदार अरुणकांत यादव यांची लढत त्यांचे वडील आणि समाजवादी पार्टीचे उमेदवार रमाकांत यादव यांच्याशीच होणार आहे. सपाचे प्रमुख अखिलेश यादव हे देखील आझमगड येथीलच खासदार आहेत.
कैफी आझमी हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य होते. त्यांच्यामुळेच मिजवान गावावर कम्युनिस्ट विचारधारेचा पगडा आहे. मात्र, आता हा परिणाम कमी झाला आहे. मंडल आणि कमंडल धोरण आणि अयोध्येच्या विषयांमुळे हा परिणाम कमी झाल्याचे सीपीआयचे नेते मानत आहेत. सीपीआयने फूलपूर पोवई मतदारसंघात तर उमेदवार देखील उभा केलेला नाही.
संपूर्ण आझमगडवर डाव्या विचारांचा पगडा आहे. मात्र, बहुतेक नेते लालगंज आणि माऊ भागातच सक्रिय होते. मऊमधून सीपीआयचे खासदार दोन वेळा निवडून गेले होते. तर 1952 पासून विधानसभेवरही सीपीएमचाच लोकप्रतिनिधी आहे.
अजूनही सीपीआय ताकदवान असल्याचे मानले जाते. पण त्याचे दृष्य परिणाम मात्र दिसत नाहीत. उत्तर प्रदेशातील अखेरच्या टप्प्यामध्ये येथे मतदान होणार आहे. कैफी आझमी यांच्या मूत्यूनंतर त्यांच्या कन्या आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी या गावात विकासाची कामे केली. मात्र त्याचा फायदा राजकीय मंचावर होऊ शकला नाही.