इम्फाळ- मणिपूर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवतींना मोफत स्कूटी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना 1 हजार रुपयांचे पेन्शन आणि राज्यात स्टार्ट अप सुरू करण्यासाठी 100 कोटी रुपयांच्या निधीच्या उपलब्धतेचेही आश्वासन देण्यात आले आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षात राज्याचा विकास केला आहे. ड्रग्जच्या विळख्यातून मणिपूरला सोडवून राज्यात स्थैर्य प्रस्थापित केले जात आहे, असे नड्डा म्हणाले.
आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील मुलींना रानी गायदिनिलू मेहेईरोई लिंगी योजनेंतर्गत 25 हजार रुपये देण्यात येतील. तसेच पंतप्रधान उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना दर वर्षाला दोन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येतील आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम 200 रुपयांनी वाढवून 1 हजार रुपये करण्याची घोषणाही जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.
इयत्ता 12 वा उत्तीर्ण झालेल्या गुणवान विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी लॅपटॉप दिले जातील. मागास, लघु आणि भूमिहीन शेतकरी, तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या पदवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाईल.
मणिपूरमधील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सम्मान निधीची रक्कम 6 हजारावरून वाढवून 8 हजार केली जाईल आणि मणिपूर कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्वासनही या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.