नवी दिल्ली – उत्तराखंड आणि गोवा विधानसभा निवडणुकांसाठीचा प्रचार शनिवारी सायंकाळी समाप्त झाला. दोन्ही राज्यांत 14 फेब्रुवारीला मतदान होईल. मात्र, निकालासाठी 10 मार्च या दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत. त्या राज्यात सत्तारूढ भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसमध्ये कॉंटे की टक्कर अपेक्षित आहे. यावेळी आम आदमी पक्षानेही संपूर्ण जोर लावला आहे. त्यामुळे उत्तराखंडमधील निवडणुकीला तिरंगी लढतीचे स्वरूप आले आहे. गोव्यात विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत.
त्यासाठी 301 उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्या राज्यात सत्तारूढ भाजपपुढे कॉंग्रेसचेच प्रमुख आव्हान आहे. मात्र, स्थानिक प्रादेशिक पक्षांबरोबरच आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, तृणमूल कॉंग्रेसही रिंगणात उतरल्याने गोवा निवडणुकीला बहुरंगी लढतीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे ती निवडणूक आणखीच रंगतदार बनली आहे.
मतदानानंतर गोवा आणि उत्तराखंडमधील उमेदवारांना निकालासाठी जवळपास महिनाभर प्रतीक्षा करावी लागेल. गोवा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, पंजाब आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी जाहीर होणार आहे.