लखनौ – करोना काळात रस्त्यावर आलेले कुटुंब, हालाकीची परिस्थिती व शारीरिक व्यंग यावर यशस्वी मात करत उत्तर प्रदेशचा तिरंदाज निरज चौहान याची आगामी आशियाई तिरंदाजी तसेच विश्वकरंडक तिरंदाजी संघात निवड झाली आहे. या स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी तो सज्ज बनला आहे.
निरजने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपले कुटुंब सांभाळताना देशाकडून खेळण्याचे स्वप्नही पूर्णत्वाला आणण्याचे अशक्य आव्हान शक्य केले आहे. निरज आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच त्यानंतर होणारी तिरंदाजी विश्वकरंडक स्पर्धांत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
निरज सोनीपत येथे झालेल्या तिरंदाजी चाचणीत पात्र ठरला. यात दुसरे स्थान मिळवत निरजने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले. निरजचे वडील अक्षयलाल हे मेरठमध्ये एक आचारी म्हणून काम करतात. ते येथील प्रकाश स्टेडियमनधील हॉटेलमध्ये कार्यरत आहेत.
या स्टेडियमवरच अन्य खेळाडूंचा सराव पाहत पाहत निरजनेही तिरंदाजीचा सराव सुरू केला. मात्र, कोरोनाच्या काळात वडिलांची नोकरी गेली आणि सगळे चित्रच बदलले. या परिस्थितीतही त्याने मिळेल ती कामे करून आपल्या कुटुंबाला हातभार लावला. निरजचा मोठा भाऊ सुनील चौहान मुष्टियोद्धा असून या दोन्ही भावांनी भाजीपाला विकून घर चालवले.
सोशल मीडियामुळे मिळाली मदत
या दोन भावांच्या या मेहनतीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याची दखल तत्कालीन केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी घेतली व त्यांना आर्थिक मदतही पोहोचवली. त्यानंतर निरजची क्रीडापटूंसाठी राखीव असलेल्या कोट्यातून आयटीबीपीमध्ये निवड झाली. आशियाई क्रीडा स्पर्धा यंदा नोव्हेंबरमध्ये जकार्ता येथे तर, एप्रिलमध्ये तुर्कीत विश्वकरंडक तसेच अमेरिकेत जागतिक क्रीडा स्पर्धा होणार असून त्यात यश मिळवण्यासाठी निरज सज्ज बनला आहे.