दुबई – पुरुष व महिला क्रिकेटपटूंना मिळत असलेल्या विसंगत बक्षीस रकमेतील तफावत दूर करण्याची तयारी आयसीसीने सुरू केली आहे. मात्र, आगामी आठ वर्षांत हे काम पूर्णत्वाला येईल, असे आयसीसीनेच म्हटले असल्याने सध्या त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे.
जर खरेच आयसीसीला ही तफावत दूर करायची असेल तर त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला गेला तरच त्याचा लाभ होईल. हा निर्णय प्रत्यक्षात उतरण्यासाठी आठ वर्षांचा कालावधी का निश्चित केला गेला, अशा शब्दात अनेक देशांच्या क्रिकेट मंडळांनी आयसीसीला सवाल केला आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉफ अलार्डीस यांनीच ही माहिती दिली आहे.
तरीही तफावत राहणारच
आयसीसीने सध्याच्या रचनेनुसार महिलांच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत विजेत्या संघाला सध्या मिळत असलेल्या रकमेत संभर टक्के वाढ जरी केली तरीही ही रक्कम पुरुष संघाला मिळत असलेल्या रकमेपेक्षा खूपच कमी असेल.
पुरुष आणि महिलांच्या आयसीसी स्पर्धेत विजेत्या संघांना मिळणाऱ्या बक्षीस रकमेतील तफावत येत्या आठ वर्षांत दूर करण्यासाठी योजना आखण्याचे काम सुरू झाले आहे. आयसीसीचे आर्थिक धोरण आठ वर्षांचा कालावधी डोळ्यांसमोर ठेवून केले जाते. या कालखंडात आम्ही महिला आणि पुरुषांच्या स्पर्धांमधील बक्षीस रकमेतील मोठी तफावत दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही ते म्हणाले.
अर्थात पुरुष व महिला खेळाडूंना मिळत असेलल्या रकमेत समानता आणण्याचा सध्या तरी विचार नाही. मात्र, काही प्रमाणात तफावत दूर करण्याचे लक्ष्य आहे, असेही त्यांनी सांगितले.