मुंबई – आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला प्रारंभ झाला आहे. यंदाची स्पर्धा बीसीसीआयसाठी करोना काळातील सर्व नुकसान पुरेपूर भरून देणारी ठरत आहे. केवळ भारतात किंवा आशिया खंडातच नव्हे तर तब्बल 99 देशांत या स्पर्धेच्या प्रक्षेपण हक्कांच्या विक्रीतून बीसीसीआयला अब्जावधी रुपये मिळाले आहेत. परदेशातील प्रक्षेपणाचे हक्क युपटीव्हीने विकत घेतले असून हा करार किती रुपयांचा झाला ते मात्र, जाहीर करण्यात आलेले नाही.
हे हक्क 29 मे 2022 पर्यंत युपटीव्हीकडे आले आहेत. या सामन्यांचे प्रक्षेपण ऑस्ट्रेलिया, युरोप, आशिया (सिंगापूर वगळता), मलेशिया, मध्य व दक्षिण अमेरिका, श्रीलंका, पाकिस्तान, जपान, नेपाळ, भूतान, मालदिव यांच्यासह एकूण 99 देशांत होत आहे.
आयपीएलने खूप कमी कालावधीत ही उंची गाठली असून स्पर्धेच्या आराखड्यातही वेळोवेळी बदल करून त्याची लोकप्रियताही टिकवून ठेवली आहे. डिस्नी स्टारच्या ऍक्विझिशन ऍण्ड सिन्डिकेशन स्पोर्टसने युपटीव्हीशी यंदाच्या स्पर्धेसाठी करार केला असला तरीही हा करार वाढवता येणार आहे. दोन्ही संस्थांनी याबाबत सकारात्मकताही दर्शवली आहे.
आगामी 2023 ते 2027 या पाच मोसमासाठी प्रक्षेपण हक्कांसाठी निविदा बीसीसीआयने मागवल्या आहेत. या संपूर्ण व्यावहारात तब्बल 50 हजार कोटी मिळतील, अशी अपेक्षा बीसीसीआयला आहे. यंदा या हक्कांसाठीचा लिलाव पहिल्यांदाच ऑनलाइन स्वरूपात होणार आहे. या लिलाव प्रक्रियेला 12 जूनपासून सुरुवात होणार असल्याची माहिती बीसीसी आयचे सचिव जय शाह यांनी दिली.