नगर -करोनामुळे जिल्हा न्यायालयाचे कामकाजात बदल करण्यात आला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा उपलब्ध करुन, फक्त अतिमहत्त्वाचे प्रकरणांची सुनावणी होत आहे. त्यामुळे वकिलांना व पक्षकारांना न्यायालयामध्ये उपस्थित न राहण्याबाबतचे आदेश जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत काणेकर यांनी दिल्या आहेत.
अतिदक्षता म्हणुन मुख्यालयामध्ये कोणीही गर्दी करू नये. वकिलांनी व पक्षकारांनी जास्तीतजास्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधेचा वापर करून, प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन शहर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. भूषण बऱ्हाटे यांनी केले आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा न्यायालयात गर्दी होवु नये म्हणून प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार पक्षकारांना व वकिलांना भूषण बऱ्हाटे यांनी आवाहन केले आहे.
न्यायाधीश, वकील, पक्षकार यांना अतिमहत्वाच्या प्रकरणात जसे की, रिमांड कामाकरिता सोईचे व्हावे याकरिता मुख्यालयामध्ये यापुर्वीच व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
तथापि, करोनाचा दिवसांगनिक प्रादुर्भाव वाढत असल्याने अतिदक्षता म्हणुन मुख्यालयामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व्दारे अतिमहत्वाची प्रकरणे चालविण्यासाठी नव्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधेची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे.
नव्या व्यवस्थेत सर्व न्यायाधीश न्यायालयाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या प्रबंधक कार्यालया शेजारील व्हीडीओ कॉन्फरन्सिंग रुम मधून कामकाज पाहतील. तसेच सर्व वकील तळ मजल्यावरील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे पुर्वीच्या कक्षातुन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे काम पाहतील. पक्षकारांकरिता तळमजल्यावरील माहिती सुविधा केंद्रातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामात सहभागी होतील.