विद्यार्थ्यांचा विचार करून राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे शिक्षणसंस्थांना आदेश
पुणे – तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष व बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होत आहे. परीक्षेचे स्वरूप व पद्धतीची माहिती होण्यासाठी संस्थास्तरावर होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची सराव चाचणी (मॉक टेस्ट) घेणे आवश्यक आहे, असे आदेश राज्य तंत्रशिक्षण मंडळाने शैक्षणिक संस्थांना दिले आहेत.
दहावी व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रम, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रम ही सर्व अभ्यासक्रमे तंत्रशिक्षण संचालनालयच्या अखत्यारित आहेत. या अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा “एमसीक्यू’ पद्धतीने ऑनलाइनद्वारे होणार आहेत. या उन्हाळी परीक्षांच्या आयोजनाबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
संस्थास्तरावरील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमनिहाय, पेपरकोडनिहाय यादी “इन्स्टिट्यूट लॉग इन’मध्ये देण्यात आली आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर ही ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होत आहे. विद्यार्थ्यांची ही पहिलीच ऑनलाइन परीक्षा आहे. त्यामुळे अंतिम वर्षाची ऑनलाइन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. त्यासाठी सराव चाचणी घेणे अनिवार्य आहे. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेचा सराव होण्याच्या दृष्टीने संस्थांनी सराच चाचणी घेण्यात यावी, असे राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव व्ही. आर. जाधव यांनी संस्थांना सूचित केले आहे.
मोबाइल क्रमांक अचूक असावा
विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरताना दिलेले मोबाइल क्रमांक मंडळाकडे उपलब्ध आहेत. मात्र, काही विद्यार्थ्यांचे मोबाइल क्रमांक उपलब्ध नाहीत. काही क्रमांकामध्ये तफावत अथवा चुका असल्याचे निदर्शनास आले आहे. मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन परीक्षेचे नियोजन करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे मोबाइल क्रमांक अचूक असणे महत्त्वाचे आहे. ऑनलाइन परीक्षेसाठी लिंक, युजर आयडी, पासवर्ड ओटीपी इत्यादी मोबाइल क्रमांकावर देण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संस्थेने विद्यार्थ्यांचे मोबाइल क्रमांकची पडताळणी करून निश्चित करावेत, असेही मंडळाने म्हटले आहे.