बीजिंग: ह्युस्टन येथील चीनचा दूतावास 72 तासांच्या आत बंद करण्याचे आदेश अमेरिकेने चीनला दिले आहेत. मात्र, अमेरिकेने दिलेले हे आदेश म्हणजे चिथावणीखोरपणा असल्याचा आरोप चीनने केला आहे. अमेरिकेने ह्युस्टनचा दूतावास बंद केल्यावर त्याचे द्विपक्षीय संबंधांवर अत्यंत दूरगामी आणि विपरीत परिणाम होतील, असे चीनने म्हटले आहे.
ह्युस्टनमधील चिनी दूतावास बंद करण्याबाबतचा निर्णय अमेरिकेने तातडीने मागे घ्यावा. अन्यथा चीनकडून त्याला योग्य आणि आवश्यक प्रत्युत्तर दिले जाईल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वॅंग वेनबीन यांनी म्हटले आहे. अमेरिकेने एकतर्फीपणे घेतलेला निर्णय निश्चितच चिथावणीखोर आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होते आहे. तसेच चीन-अमेरिकेदरम्यानच्या दूतावासविषयीच्या द्विपक्षीय कराराचाही भंग होतो आहे, असेही वॅंग यांनी म्हतले आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून विविध मुद्द्यांवर तणाव सुरू आहे. त्यामध्ये व्यापारी युद्ध आणि कोविडची जगभर पसरलेल्या साथीला चीन जबाबदार असल्याचा अमेरिकेचा आरोप ही दोन प्रमुख कारणे आहेत. याशिवाय दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या वाढत्या प्रस्थाला रोखण्यासाठी अमेरिकेकडून तेथे युद्धनौका तैनात केल्या गेल्या आहेत. अर्धस्वायत्त हॉंगकॉंगमध्ये चीनकडून वादग्रस्त राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला गेल्याचेही कारण दोन्ही देशांमधील तणाव वाढण्यास कारणीभूत आहे.
ह्युस्टनमधील चिनी दूतावासाच्या आवारात मंगळवारी संध्याकाळी काही कागदपत्रे जाळली जात असल्याचे लक्षात आल्यावर अग्निशामक दल आणि पोलिसांना पाचारण केले गेले होते. इमारतीतून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी बघितले. मात्र पोलीस अथवा फायर फायटर्सना इमारतीमध्ये प्रवेशाची परवानगी दिली गेली नव्हती.