अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
वॉशिंग्टन – करोनाच्या अनुषंगाने अमेरिकेने आता चीनच्या विरोधात अत्यंत गंभीर स्वरूपाची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. करोनाबद्दल चीनकडून जबरा दंड वसुली करण्याचा प्रस्तावही अमेरिकेच्या विचाराधिन आहे असे त्यांनी म्हटले आहे. जर्मनीने चीनकडून 130 अब्ज युरोची नुकसान भरपाईची मागणी केली आहे, आमची मागणी त्यापेक्षा किती तरी अधिक असेल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
आज वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले की, जर्मनीने चीनमधील घटनाक्रमाकडे लक्ष देणे सुरू केले आहे, तसेच काम आम्हीही सुरू केले आहे. जर्मनीने चीनकडून जितकी नुकसान भरपाई मागितली आहे त्यापेक्षा आम्ही अधिक पैसे त्यांच्याकडून मागणार आहोत असे ते म्हणाले.
नोव्हेंबर महिन्याच्या मध्याला करोना विषाणू चीन मधूनच जगात पसरला आणि त्याने आत्तापर्यंत दोन लाखांच्या पेक्षा अधिक बळी घेतले आहेत. करोना विषयी चीनने पारदर्शकता बाळगली असती आणि त्यांनी जगाला त्या विषयी अधिच सावध केले असते तर जगाची इतकी मनुष्य हानी व आर्थिक नुकसान झाले नसते असे अमेरिकेसह युरोप व अन्य राष्ट्रांचे म्हणणे आहे.
जर्मनी आणि अमेरिकेच्या पाठोपाठ आता अन्यही राष्ट्रांनी चीन कडून नुकसान भरपाई मागण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू केला आहे. आम्ही चीनकडून नेमकी किती नुकसान भरपाई मागायची यावर विचार सुरू केला आहे असेही ट्रम्प यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. करोना विषाणुंच्या प्रसाराला चीनच कसा जबाबदार आहे याचा तपास आम्ही आता सुरू केला आहे आणि तो अत्यंत गंभीर स्वरूपाच आहे असे ते म्हणाले.