वॉशिंग्टन – इराकमधील इराण समर्थक गटांमध्ये समन्वय साधण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचा आरोप असलेल्या लेबनीज हिज्बुल्लाह कमांडर महंमद कवथारानी याच्या हालचाली, नेटवर्क आणि सहयोगींची कोणतीही माहिती देण्याबद्दल अमेरिकेने शुक्रवारी दहा दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले. कवथारानी हा लेबानी शिया चळवळीतील इराकमधील वरिष्ठ म्होरक्या मानला जातो. कासिम सुलेमानी याने पूर्वी जमवलेल्या इराणशी संबंधित काही अर्धसैनिक गटांशी राजकीय समन्वय करण्याचे काम हाती घेतले आहे, असे अमेरिकेच्या विदेश विभागाच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
तेहरानच्या लष्कराशी संबंधित असलेल्या रिव्होल्युशनरी गार्डचा ताकदवान म्होरक्या असलेला सुलेमानी हा जानेवारी महिन्यात बगदादमध्ये असताना त्याची अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात हत्या करण्यात आली होती. कवथारानी हा 2013 पासून अमेरिकेच्या दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत आहे. इराक सरकारच्या नियंत्रणाबाहेरील आणि विदेशी दूतावासांवर हल्ले करणाऱ्या गटांच्या कारवायांसाठी तो सुविधा देतो आहे. दहशतवाद्यांचे प्रशिक्षण, निधीसंकलन, राजकीय आणि साधनसामग्रीचे सहकार्य देण्यात तो आघाडीवर आहे, असेही अमेरिकेच्या विदेश विभागाने म्हटले आहे.