कोरोनानं हिरावलं त्याचं ‘जिल्हाधिकारी’ होण्याचं स्वप्न; अकोल्यातील यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या प्रांजल नाकटचा मृत्यू

अकोला – कोरोनामुळे येणारा प्रत्येक दिवस काही तरी अघटीत घडल्याच्या बातम्या घेऊन येत आहे. अलीकडच्या काळात तर कोरोनामुळे तरुणांच्या झालेल्या मृत्यूचं प्रमाण खुप मोठं आहे. असाच एक हृदय पिळवटून टाकणारा मृत्यू अकोल्यात झाला आहे. प्रांजल नाकट (वय 25, रा. तांदळी बु., अकोला) असे करोनामुळे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रांजलने यावर्षीची केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा क्रॅक केली होती. मात्र, करोनाने त्याचे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न हिरावले.

या महिन्याच्या सुरुवातीला प्रांजलला कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले होते. त्याला उपचारासाठी अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, कोरोनामुळे प्रांजलची फुफ्फुसं निकामी होत असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी हैदराबादला हलवण्याचा निर्णय त्याच्या कुटूंबियांनी घेतला. त्याला 6 मे रोजी अकोल्यावरून एअर अँब्यूलन्सने हैदराबादमधील ‘यशोदा हॉस्पिटल’मध्ये हलवण्यात आले होते. मध्यंतरी दोन दिवसांपुर्वी त्याच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली होती. मात्र, काल (ता. 15) पहाटे त्याची प्रकृती परत ढासळल्याने प्रांजलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी एका बापाचा सुरू असलेला संघर्षही आज प्रांजलच्या मृत्यूने थांबला.

प्रांजलचे वडील प्रभाकर नाकट हे अकोला महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत आहेत. प्रांजलने यावर्षीच केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा पास केली होती. प्रांजलचं प्राथमिक आणि शालेय शिक्षण अकोल्यात झालं होतं. तर त्याचं अभियांत्रिकीचं शिक्षण पुण्याच्या सिंहगड महाविद्यालयात झालं आहे. प्रांजलवर अकोल्यातील मोहता मिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रांजलच्या उपचारासाठी सरसावले होते नातेवाईक –

अकोल्याच्या खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रांजलची तब्येत अत्यंत गंभीर झाली होती. त्यामुळे प्रांजलचे फुफ्फुस अतिशय नाजूक अवस्थेत होते. जगण्याची आशा धूसर होत असताना नातेवाईकांनी फुफ्फुसावर उपचार करणाऱ्या हैदराबादच्या ‘यशोदा हॉस्पिटल’मध्ये त्याला भरती करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे फुफ्फुसं बाधित झाल्यानंतर आई-वडिलांची मुलाचा जीव वाचावा यासाठी नातेवाईकांच्या मदतीने धडपड सुरू होती. एअर अँब्युलन्स आणि प्रांजलच्या उपचारासाठी 55 लाखांचा खर्च येणार होता. प्रांजलचे वडील प्रभाकर यांच्याकडे आपल्या मिळकतीतून वाचवलेले 28 लाखच होते. मात्र, समाज, नातेवाईक, मित्र यांच्या मदतीतून त्यांनी मुलासाठी 55 लाख रुपयांची जुळवणूक केली. यानंतर प्रांजलला उपचारासाठी 6 मे रोजी एअर अँब्युलन्सने हैदराबादच्या यशोदा हास्पिटलला हलवले गेलं. मात्र, दुर्दैवाने कोरोनासोबच्या लढाईत प्रांजल जीवनाची लढाई हरला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.