काबूल – काबूल विमानतळाबाहेर आज दोन बॉम्बचा स्फोट झाले. यामध्ये किमान 13 जण ठार आणि 15 जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. हे दोन्ही आत्मघातकी बॉम्बस्फोट असल्याचे समजते आहे. काबूल विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट झाला असल्याच्या वृत्ताला पेंटॅगॉनने दुजोरा दिला आहे.
या बॉम्बस्फोटात अमेरिकेचे काही कर्मचारीही जखमी झाले असल्याचे पेंटॅगॉनने म्हटले आहे. मात्र या जीवितहानीचा तपशील पेंटॅगॉनने दिला नाही. अफगाणिस्तानमधून तातडीने निघून जाण्याच्या घाईमुळे या विमानतळावर हजारो नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. अमेरिकेकडून नागरिकांना सुरक्षितपणे अफगाणिस्तानबाहेर नेले जात असल्याने ही गर्दी करण्यात आली होती.
या विमानतळावर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा पाश्चात्य देशांनी वर्तवला होता. सुरक्षेसाठी नागरिकांनी विमानतळाच्या परिसरामधून तातडीने दूर निघून जावे आणि सुरक्षित आश्रय घ्यावा, असे आवाहन ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने आपल्या नागरिकांसाठी जारी केला होता. हा एक आत्मघातकी हल्ला असू शकतो असेही या इशाऱ्यामध्ये म्हटले गेले होते. मात्र या इशाऱ्याकडे काही जणांनी दुर्लक्ष केले होते.