नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री पशुपतीकुमार पारस यांनी झेड प्लस दर्जाची सुरक्षा मिळावी यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना साकडे घातले आहे. राजकीय कारस्थानामुळे जीविताला धोका असल्याचा दावा पारस यांनी केला आहे.
लोकजनशक्ती पक्षाचे (लोजप) नेते असणाऱ्या पारस यांनी येथे पत्रकार परिषदेत धमक्यांचे फोन येत असल्याची माहिती दिली. सुरक्षाकवच मिळावे यासाठी शहांना पत्र पाठवले असल्याचेही त्यांनी सांगितले. पारस हे दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे बंधू आहेत. पारस आणि पासवान यांचे पुत्र चिराग यांच्यात सध्या लोजपचा ताबा मिळवण्यावरून राजकीय संघर्ष सुरू आहे.
पारस यांच्या बंडामुळे लोजपमध्ये फूट पडली. त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी चिराग यांना लोजपच्या अध्यक्षपदावरून हटवले. त्या गटाने पारस यांना लोजपचे अध्यक्ष म्हणून जाहीर केले आहे. राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडून धोका असल्याचे सांगणाऱ्या पारस यांनी कुणाचा नामोल्लेख केलेला नाही. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात पारस यांची मंत्रिपदी वर्णी लागली.