लखनौ – अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील आघाडीशी फारकत घेणारे सहयोगी सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओम प्रकाश राजभर यांना सरकारने वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपासूनच ते भाजपच्या गोटात गेल्याचे दिसून आले होते. त्यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता.
योगी सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव माजी कॅबिनेट मंत्री असलेले राजभर यांना वाय श्रेणी सुरक्षा कवच दिले आहे. त्यांच्या पक्षाचे उत्तर प्रदेश विधानसभेत सहा आमदार आहेत. राजभर आणि प्रगतीशील समाजवादी पक्षाचे (लोहिया) प्रमुख शिवपाल सिंह यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या डिनरला हजेरी लावली होती.
राजभर हे आधी भाजपबरोबरच होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी ते समाजवादी पक्षाबरोबर गेले होते, पण आता पुन्हा त्यांनी भाजपचा मार्ग पत्करला आहे.