पुणे – करोना संसर्गाच्या संकटात अनेक रुग्णांना रूग्णवाहिकाअभावी उपचाराविना ताटकळत रहावे लागले. त्याचवेळी माझ्या वानवडी प्रभागासाठी स्वतंत्र रूग्णवाहिका आणि शववाहिनी उपलब्ध करून देण्याचे मी ठरवले होते. त्यानुसार आज पासून एक अद्ययावत रुग्णवाहिका त्यांच्या सेवेत दाखल झाली असून, 365 दिवस कुठल्याही प्रकारचे शुल्क न आकारता ही रुग्णवाहिका आपल्या सेवेत हजर राहील, असे मत राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आणि एकलव्य प्रतिष्ठान यांच्या वतीने वानवडीकरांच्या सेवेसाठी आद्ययावर रूग्णवाहिका आणि शववाहीनीचा लोकार्पण सोहळा पार पडला. वानवडी येथील जगताप चौकात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह नगरसेविका रत्नप्रभा जगताप, सुदामराव जगताप, सुनील जांभूळकर, संदीप जगताप, प्रफुल्ल जांभूळकर, सुरेश गव्हाणे, शिवराम जांभूळकर तसेच जयहिंद मंडळाच्या ज्येष्ठ नागरीक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. रूग्णवाहिकेबरोबरच उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या सेवेत शववाहिनी देखील वर्षभर विनामूल्य हजर राहील, असेही जगताप यांनी सांगितले.