प्रयागराज – उमेश पाल हत्याप्रकरणातील गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम दोन दिवसांपूर्वीच पोलीस चकमकीत ठार झाले होते. त्यानंतर आता या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची पोलीस बंदोबस्तात हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणावर एमआयएमचे नेते असुदुद्दीन औवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे.
औवेसी म्हणाले की, “या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची कठोर चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याबाबत तपास पथक तयार करण्यात येणार आहे. या टीममध्ये उत्तर प्रदेशातील एकाही अधिकाऱ्याचा समावेश केला नाही तर बरे होईल, कारण त्याच्या उपस्थितीतच या दोघांची हत्या झाली आहे. तसेच यावेळी त्यांनी पोलिसांनी एकही गोळी झाडली नाही. मारेकरी तिथे कसे पोहोचले, पोलिसांनी त्यांना का रोखले नाही”, असे प्रश्न उपस्थित केले.
पुढे ते म्हणाले की, “आज भाजपची सत्ता आहे, उद्या दुसरी कोणाची असेल, हे तुम्ही विसरत आहात. उद्या हाच तांडव मानवतेवर होणार आहे. अशामुळं लोकशाही यशस्वी होणार आहे का, संविधान मजबूत होईल का? या हत्येला दहशतवादाचं नाव देणार नाही, तर काय मारेकऱ्यांना देशभक्त म्हणणार का, त्यांना हार घालणार का? उत्तर प्रदेशातील भाजप सरकार कायद्यानुसार चालत नाही, तर बंदुकीच्या जोरावर चालत आहे, असे मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो. त्यामुळे लोकांचा संविधानावरील विश्वास कमी होईल.”
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये ही सर्व घटना घडली. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना ही हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील तीनही हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकरणाची सध्या देशभरात चर्चा होत आहे.