उत्तर प्रदेशातील इटावा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीने नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे. या विद्यार्थीनीच्या मित्रांनी इंस्टाग्रामवर तिचे फेक अकाउंट बनवून तिचा फोटो आणि फोन नंबर पोस्ट केल त्यानंतर लोक तिच्या फोटोवर अश्लील कमेंट करू लागले. यामुळे दुखावलेल्या तरुणीने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी यमुना नदीतून मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी एसपी कपिल देव सिंह यांनी सांगितले की, हे प्रकरण आयटी कायद्यांतर्गत नोंदवण्यात आले असून, तपास निरीक्षकांच्या अखत्यारीत सुरू आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दंड संहितेच्या कलम 154, भारतीय दंड संहिता कायदा 1860 मधील कलम 363 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 अंतर्गत कलम 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.
मृत मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी सरस्वती इंटर कॉलेजमध्ये गेली होती. बराच वेळ घरी न परतल्याने मी तिच्या शाळेत गेलो कॉलेजमध्ये कळलं की सुट्टीमुळे ती मैत्रिणींसोबत परत गेली. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या मुलीने नदीत उडी घेतल्याचे त्यांना समजले.