अमित शहांनी केला आरोप
कुशीनगर – समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या पक्षांनी आजवर केवळ जातीच्या आधारावरच राजकारण केले आहे असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथील प्रचार सभेत बोलताना केला. भारतीय जनता पक्ष मात्र समाजातील सर्वच घटकांसाठी कार्यरत आहे असा दावा त्यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता आल्यास मुलींना मोफत स्कूटर आणि उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गरीब तरुणांना मोफत टॅबलेट आणि स्मार्टफोन दिले जातील अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. मायावती आणि अखिलेश यांचा उल्लेख बुवा-बबुआ असा करीत त्यांनी या दोन्ही नेत्यांवर यावेळी जोरदार हल्लाबोल केला.
एक सरकार सत्तेवर येऊन एका जातीसाठी काम करते, दुसरे सरकार येऊन दुसऱ्या जातीसाठी काम करते असेच प्रयोग इतके दिवस उत्तरप्रदेशात सुरू होते. त्यानंतर भाजपच्या सरकारने ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर संपूर्ण उत्तर प्रदेशसाठी काम केले असे ते म्हणाले. गरीब आणि वंचितांसाठी काम करण्याच्या बाता सर्वांनीच गेल्या 70 वर्षात मारल्या पण त्यांच्या कल्याणासाठी कोणीच काही केले नाही असा आरोप अमित शहा म्यांनी केला.
एकच जात, एकच धर्म दिसतो
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याकडे दोन चष्मे आहेत. त्यातील एकातून केवळ एकच जात दिसते आणि दुसऱ्यातून एकच धर्म दिसतो, अशा शब्दात अमित शहा यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली.