प्रयागराज – कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशातील संगमनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रयागराजमध्ये रोड शो केला. सुमारे चाळीस मिनिटांच्या या रोड शो ला स्थानिक नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. इंदिरा गांधींचे जन्मस्थान असलेल्या स्वराज भवन येथून त्यांचा हा रोड शो सुरू झाला.
रोड शोच्या मार्गावर दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. विशेषत: घरांच्या छतावर महिलांनीही त्यांना पहाण्यासाठी केलेली गर्दी ही या रोड शोचे आकर्षण ठरली. अलाहाबाद विद्यापीठाच्या चौकात त्यांचा रोड शो आल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांच्या एका गटाने त्यांना ऑफलाइन परीक्षेच्या संबंधात एक निवेदन दिले.
त्यात विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षेला विरोध दर्शवला असून ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घेतली पाहिजे, असा आग्रह धरला आहे. त्यांनी म्हटले आहे की आमचा सारा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने झालेला असताना परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची गरज नाही.
त्यांच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन प्रियंकांनी त्यांना दिले. त्यांच्या या रोड शो ला मिळालेला प्रतिसाद आमच्यासाठी उत्साहवर्धक ठरला आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी दिली आहे.