पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वसतिगृह मिळालेल्या विद्यार्थ्याची यादी जाहीर केली आहे. या विद्यार्थ्यांनी वसतिगृह शुल्क भरून प्रवेश निश्चित करावे, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये बंद होती. तसेच विद्यापीठ संकुलातील वसतिगृहे बंद होती. आता मात्र करोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे विद्यापीठाने प्रारंभी संशोधक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला. उर्वरित वसतिगृहे सुरू केले जातील, असे विद्यापीठाने स्पष्ट केले. मात्र सर्वच वसतिगृहे तत्काळ सुरू करावी, अशी मागणी युवक क्रांती दलाचे पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, कार्यवाह कमलाकर शेटे, आदित्य आरेकर, निर्भय गायकवाडसह अनेक विद्यार्थ्यांनी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्याकडे केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनने वसतिगृह प्रवेशप्रक्रिये संदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले.
वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यानी मुदतीत वसतिगृह शुल्क भरावे. पाच दिवसांत शुल्क न भरल्यास त्या ठिकाणी यादीतील विद्यार्थ्यास वसतिगृह प्रवेश दिले जातील. प्रवेश यादीतील विद्यार्थ्यानी वसतिगृह शुल्क भरल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने वसतिगृह क्रमांक व खोली क्रमांक दिला जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.