Statue of Vilasrao Deshmukh | माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवारी लातूरमध्ये झाले. यावेळी विलास कारखाना परिसरात आयोजित सोहळ्यात बोलताना विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेता रितेशचा वडिलांच्या आठवणीने कंठ दाटून आला.
वडीलांच्या आठवणींना उजाळा देताना रितेश म्हणाला की, बाबांनी आम्हाला कधीही बंधने घातली नाही. मुलांना जे करायचे ते त्यांनी करू दिले, कधीही रोखले नाही. वडील म्हणून हे करख् ते कर असे त्यांनी कधीही बंधन लावले नाही. मुलांवर कधीही कुठल्याही गोष्टीचा दबाव आणला नाही. मुलांच्या भरारीसाठी आपण ताकद देऊ अशीच भूमिका त्यांची राहीली. त्यामुळेच आम्ही घडलो.
यावेळी रितेशने जोरदार राजकीय टोलेबाजीही लगावली. रितेशने म्हटले की, आजकाल राजकारणामध्ये कुठल्या-कुठल्या पातळीला भाषण जातात हे पाहून दु:ख होते. जो महाराष्ट्र एकेकाळी दिग्गज नेत्यांनी आपल्या भाषणांनी गाजवला, तो काळ आता दिसत नाही. भावा-भावांचे प्रेम विलासराव साहेब आणि दिलीपराव साहेबांनी शिकवले. काका आणि पुतण्यामधील प्रेम कसे असावे याचे हे उत्तम उदाहरण आहे.
आज साहेबांना जाऊन जवळपास १२ वर्षे झाली. थोडी फार उणीव नेहमीच भासते, पण ही उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका नेहमी मागे उभे राहिले. पण, आज मी सर्वांसमोर सांगतो, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका आणि पुतण्याचे प्रेम कसे असले पाहिजे याचे ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवर आहे, असेही रितेश म्हणाला.
मंचावर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले
या भाषणात रितेशचा कंठ दाटून आला, डोळ्यात अश्रू आले. भाषण थांबले. त्यावेळी रितेश यांच्या आई वैशाली देशमुख यांचेही डोळे पाणावले. बाजूला बंधू, माजी मंत्री अमित देशमुख यांनी रितेश यांच्या पाठीवर हात ठेवत धीर दिला. त्यावेळी आई वैशाली आणि काका दिलीपराव देशमुख यांच्यासह मंचावर आणि उपस्थित अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.