मुंबई :- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे घरचे मैदान असलेल्या वानखेडे स्टेडियमवर खुद्द सचिनच्याच पूर्णाकृती पुतळ्याचे आज (बुधवार) अनावरण होणार आहे. याच मैदानावरून सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता व 2013 साली याच मैदानावर आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळला होता.
हा पुतळा एमसीएने स्टेडियममधील सचिन तेंडुलकर स्टँडजवळ बसवला आहे. वानखेडेच्या एमसीएफ लाउंजमध्ये होत असलेल्या या सोहळयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळयाचे अनावरण होणार आहे. या सोहळयासाठी खुद्द सचिनसह बीसीसीआयचे सचिव जय शाह, खजिनदार आशीष शेलार यांच्यासह अनेक आजी-माजी खेळाडू तसेच सेलेब्रीटी उपस्थित राहणार आहेत.
सचिन रमेश तेंडुलकर याची ओळख क्रिकेटचा देव अशीही आहे. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न हा पुरस्कार मिळविणारा तो पहिला खेळाडू आणि सर्वात तरुण आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित झालेला हा एकमेव क्रिकेटपटू आहेत. 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. वानखेडे स्टेडियमवर सध्या सचिन तेंडुलकरच्या नावाने एक प्रेक्षक गॅलरी आहे. मात्र आता सचिनचा पुतळाही आपल्याला दिसणार असून त्याचा हा अनोखा सन्मान असेल.
#WATCH | Maharashtra | Final touches being given to the statue of Cricket legend Sachin Tendulkar at Wankhede Stadium. The statue has been installed by MCA (Maharashtra Cricket Association) near Sachin Tendulkar Stand at the stadium. The statue is dedicated to the 50 years of his… pic.twitter.com/w1BmTJNsuJ
— ANI (@ANI) October 31, 2023
सचिनने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला. या स्टेडियममधील एक स्टँड त्यांच्या नावाने समर्पित आहे. दोन दशकांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर, उजव्या हाताच्या फलंदाजाने नोव्हेंबर 2013 मध्ये वानखेडेवर 200वी आणि शेवटची कसोटी खेळली.
भारताचे लक्ष उपांत्य फेरीकडे..
चालू आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग सहा सामने जिंकले आहेत. 2011 नंतर ट्रॉफी जिंकण्याकडे भारताचे लक्ष लागले आहे. योगायोगाने याच मैदानावर टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला होता. सलग सातव्या विजयासह उपांत्य फेरी गाठण्याकडे भारताचे लक्ष असेल.
कसा असेल पुतळा…
सचिनची जी मुख्य मूर्ती आहे, त्याची उंची दहा फूट आहे. त्याच्यावर जी बॅट आहे ती चार फुटांची आहे. अशी एकूण 14 फूट उंचीची मूर्ती आहे. त्याच्या खाली जगाचे चिन्ह म्हणून क्रिकेटचा चेंडू साकारला आहे. ज्यामधून जगाचा नकाशा उलगडला आहे. त्या चेंडूच्या पॅनलवर सचिनचे विक्रम हे नमूद केलेले आहेत. यासह सचिनच्या कामगिरीला उद्देशून एक वाक्यही असणार आहे. सचिनचा हा पूर्णाकृती पुतळा कांस्याचा बनवला आहे. त्याच्या खाली असलेला चेंडूही कांस्याचा बनवण्यात आला आहे.
दरम्यान, 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने फलंदाजीत अनेक विक्रम केले आहेत. आता पुतळा उभारुन त्याचा अनोखा सन्मान करण्यात येत आहे. सचिन याने भारतासाठी 200 कसोटी सामने, 463 एकदिवसीय आणि एक टी-20 सामना खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (100) आणि धावा (34,357) करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.