मुंबई – बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीच्या मदतीने राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. सध्या राज्यात शिंदे सरकार असल्याचं दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या या बंडानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ माजली होती. आणि त्यामुळेच का होईना ‘एकनाथ शिंदे’ हे नाव सर्वदूर परिचयाचे झाले. आता थेट साता समुद्रापलिकडे एकनाथ शिंदे यांची ख्याती पोहचल्याचे पाहायला मिळत आहे.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून, त्यांच्या समर्थकांनी चक्क मुख्यमंत्री शिंदेचा अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरांमधील टाइम स्क्वेअर या ठिकाणी केक कापत जोरदार वाढदिवस साजरा केला आहे. युवासेनेचे नितीन लांडगे यांच्या मित्रांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात शिंदे यांचा केक कापत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी या तरुणांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर देखील झळकवला होता. आता या तरुणांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अत्यंत कमी वेळात आपला पदभार सांभाळून महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरात परसरलेल्या तमाम मराठी माणसाच्या मनात घर करणारे मुख्यमंत्री म्हणून ‘एकनाथ शिंदे’ आता चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत.