नवी दिल्ली : मागील काही वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. तरुणाईपासून ते वयोवृद्धांना या सोशल मीडियाचे वेड लागले असल्याचे दिसून येत आहे.त्यातच काही लोक ऑन ड्युटी असताना सोशल मीडियाचा वापर करत आहेत. त्यात पोलिसांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे दिसत आहे. आता ऑन ड्युटी असणाऱ्या लोकांना सोशल मीडियाचा वापर बॅन करण्यात आला आहे.
ऑनड्युटी असताना सोशल मीडियाचा सर्रास वापर करणाऱ्या पोलिसांवर उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने कडक कारवाई केली आहे. आता कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला कर्तव्यावर असताना वैयक्तिक वापरासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार नाही. ड्युटी संपल्यानंतरही गणवेशात रिल्स बनवण्यावर सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. कामाच्या ठिकाणाहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपण देखील प्रतिबंधित आहे. योगी सरकारने बुधवारी पोलिसांसाठी नवीन सोशल मीडिया पॉलिसी जारी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक डीएस चौहान यांच्या मंजुरीनंतर योगी आदित्यनाथ सरकारने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. ड्युटीवर असताना पोलीस कर्मचाऱ्यांना सोशल मीडिया साइटचा वापर करता येणार नाही.
उत्तर प्रदेश पोलिस कर्मचार्यांसाठी जारी केलेल्या सोशल मीडिया पॉलिसीनुसार, पोलीस स्टेशन, ऑफिसची तपासणी आणि पोलीस ड्रिल किंवा फायरींग सहभागी होण्याचे लाईव्ह करणे यापुढे शक्य होणार नाही. कारवाईशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. असे कोणतेही कृत्य गोपनीयता धोरणाचे उल्लंघन मानले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.