पिंपळे गुरव – काटे पुरम चौक ते रामकृष्ण चौक येथील रस्त्यावर दुतर्फा पदपथाला लागून अनधिकृतपणे वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याकडे वाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पिंपळे गुरव परिसरात बेशिस्त वाहन पार्किंगला बळ मिळत आहे. अशा बेशिस्त वाहन पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत तीन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून येथील रस्त्यावर सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात आले. रस्त्याच्या कडेला पदपथ तयार करण्यात आले. मात्र येथील रस्त्याच्या कडेला अनधिकृतरित्या बेशिस्तपणे वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याकडे सांगवी वाहतूक पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बेशिस्तपणे वाहने पार्क केल्यामुळे अंतर्गत रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येत असताना मुख्य रस्त्यावरील येणारी जाणारी वाहने दिसून न आल्यामुळे अपघात घडून येत आहेत. गेल्या सहा महिन्यात याच रस्त्यावर 19 वर्षीय मुलाचे तसेच 31 वर्षीय मुलाचा अपघात घडून जागेवरच मृत्यू झाला होता. याव्यतिरिक्त अनेक किरकोळ अपघातही घडून आले आहेत. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
नियमावलीकडे दुर्लक्ष
रस्त्याच्या दुतर्फा बाजूस पी 1, पी 2 फलक वाहतूक विभागाकडून लावण्यात आले आहेत. मात्र वाहन पार्क करणारे वाहनचालक बेशिस्तपणे वाहने पार्क करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे. सांगवी वाहतूक विभागातील वाहतूक पोलिस येथील ठिकाणी बेशिस्तपणे वाहने पार्क करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करीत नसल्याने दिवसेंदिवस वाहन पार्क करणाऱ्यांचे फावत चालले आहे.
सध्या टोईंग कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे वाहने उचलणारे टेम्पो उपलब्ध नाहीत. त्यामुळे कारवाई करता येत नाही. या आधी कारवाई होत होती. तरी सदर ठिकाणी पर्यायी व्यवस्था करून वाहतूक पोलीस त्या ठिकाणी पाठवून कारवाई करण्याचे आदेश देतो.
– प्रसाद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी वाहतूक विभाग.