पुणे – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने जिल्ह्यातील 63 ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहे. तसेच पुणे शहरात तसेच पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या रस्त्यांसह पुणे-सातारा व नाशिक महामार्गांवर नियमित पाहणी करुन अपघातांच्या ठिकाणी उपाययोजना करुन त्यात सातत्य ठेवावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच ग्रामीण भागातील सतत अपघात होणाऱ्या ठिकाणांच्या ठिकाणी (ब्लॅक स्पॉट) करण्यात आलेल्या उपाययोजनांची संबंधित यंत्रणांनी माहिती दिली. आवश्यकतेप्रमाणे रस्त्यावर रम्बलर्स बसविणे, सूचना फलक, रोड मार्किंग्ज, रस्त्यावरील परावर्तक, ब्लिंकर्स, रिफ्लेक्टर्स आदी बसविण्याची कार्यवाही होत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचना…
- यवत, शिक्रापूर, रांजणगाव (ता. शिरुर) येथे यंत्रणांनी सुरक्षा व उपाययोजनांविषयक पाहणी करावी.
- अत्याधुनिक जीवरक्षक साधनसामग्री असलेल्या रुग्णवाहिका येथे त्वरेने उपलब्ध होऊ शकतील यासाठी एसओपी बनवावी.
- अपघात झाल्यानंतर प्रतिसाद प्रणाली कशा पद्धतीने कार्यरत आहे यासंबंधी माहितीचे विश्लेषण करावे.
- गोल्डन अवरमध्ये रुग्णांना उपचार मिळावा यादृष्टीने रुग्णवाहिका तेथे गतीने उपलब्ध करता येईल अशी व्यवस्था करावी.