IPL 2024 ( KKR vs SRH Qualifier 1) Preview : आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये कोणता संघ कोणाशी भिडणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. पहिला क्वालिफायर आज( मंगळवार,21 मे) अहमदाबादमध्ये संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. यामध्ये टेबल टॉपर कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या स्थानावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादशी मुकाबला करेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळे चाहत्यांना एका रोमांचक सामन्याच्या पूर्ण अपेक्षा आहेत.
हैदराबाद-केकेआरला मिळतील दोन संधी …
हैदराबाद आणि केकेआरला ग्रुप स्टेजनंतर पॉइंट टेबलमध्ये पहिल्या दोनमध्ये राहण्याचा फायदा मिळेल. वास्तविक, क्वालिफायर-1 खेळणाऱ्या दोन्ही संघांना अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दोन संधी मिळतात. KKR आणि हैदराबाद यांच्यातील क्वालिफायर-1 मधील विजेता संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाचा सामना बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एलिमिनेटरच्या विजेत्या संघाशी होईल. आरसीबी आणि राजस्थान यांच्यातील पराभूत संघाचा प्रवास संपेल, तर विजेत्या संघाला क्वालिफायर-1 मधील पराभूत संघाचा सामना करावा लागेल व अंतिम फेरीत पोहचण्याची संधी मिळेल.
आयपीएल प्लेऑफमध्ये केकेआरचा रेकॉर्ड …
दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) आयपीएलच्या इतिहासात प्रथमच गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ आता मंगळवारी क्वालिफायर-1 मध्ये सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. केकेआर संघ आतापर्यंत 13 वेळा आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचला आहे आणि आठ वेळा विजय मिळवला आहे, तर पाच सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याच वेळी, संघ क्वालिफायर-1 मध्ये कधीही पराभूत झालेला नाही. अशा स्थितीत केकेआर हैदराबादला कडवे आव्हान देऊ शकतो.
कोलकाता संघाचे प्लेऑफमध्ये चांगले रेकॉर्ड असून त्यांनी दोनदा विजेतेपद पटकावले आहे. KKR संघाने 2021 मध्ये प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अंतिम फेरी गाठली होती जिथे त्यांना सीएसके कडून अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. केकेआर संघाने क्वालिफायर-1 मध्ये एकही सामना गमावला नसला तरी एलिमिनेटरमध्ये दोनदा आणि क्वालिफायर-2 मध्ये दोनदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत या संघाने दोनदा क्वालिफायर-1 खेळला आहे आणि दोन्ही वेळा अंतिम फेरी गाठून विजेतेपद पटकावले आहे. कोलकाता संघाने 2012 आणि 2014 मध्ये चेन्नई आणि पंजाब (KXIP) यांना अनुक्रमे पराभूत करून दोनदा ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले.
हैदराबाद संघ 4 वर्षानंतर पोहोचला प्लेऑफमध्ये…
यावेळी पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार होता. तब्बल चार वर्षांनंतर हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. 2020 मध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम चारमध्ये स्थान मिळवले होते. तेव्हापासून आतापर्यंत संघात अनेक मोठे बदल झाले आहेत. खेळाडूंमध्येच नव्हे तर कर्णधारपदातही प्रयोग झाले. गेल्या वर्षी एडन मार्करम संघाचा कर्णधार होता, पण संघाला काही विशेष करता आले नव्हते. यावेळी पॅट कमिन्सने संघाला प्लेऑफमध्ये नेले आणि संघ दुसऱ्या स्थानावर राहिला. म्हणजे पॅट कमिन्सने सगळंच बदलून टाकलं. तो एकमेव कर्णधार आहे जो प्रथमच आयपीएलमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व करत होता आणि संघानेही चांगली कामगिरी केली. हैदराबादने प्लेऑफमध्ये 11 सामने खेळले आहेत. त्यातील 5 लढतींमध्ये त्यांचा विजय झाला आहे. तर 6 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
हैदराबादचं पारडं जड….
दोन्ही संघ आतापर्यंत 26 वेळा आमनेसामने आले आहेत. यात कोलकात्याने 17 वेळा, तर सनरायझर्स हैदराबादने 9 वेळा बाजी मारली आहे. आकडेवारीतून कोलकाता नाईट रायडर्सचं पारडं जड वाटत आहे. पण प्लेऑफचं गणित पाहिलं तर सनरायझर्स हैदराबादने कोलकात्याचा वरचढ दिसत आहे.
हैदराबाद आणि कोलकात्याचे संघ प्लेऑफमध्ये एकूण 3 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये हैदराबादचं पारडं जड दिसत आहे. प्लेऑफमध्ये हैदराबादने दोन वेळा तर कोलकात्याने एकदा विजय मिळवला आहे. यादरम्यान, दोन्ही संघ दोन वेळा एलिमिनेटर तर एकदा क्वालिफायर-2मध्ये आमने सामने आले होते.
अन्… हैदराबाद दुसऱ्या स्थानावर राहिले
एक दिवस आधी म्हणजे रविवारी, हैदराबादने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव केला होता आणि 17 गुणांसह लीग टप्पा पूर्ण केला होता. त्याचवेळी राजस्थान रॉयल्स आणि केकेआर यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला. या कारणामुळे दोन्ही संघाला प्रत्येकी 1-1 गुण मिळाले. यासह कोलकाता नाइट रायडर्स संघाने या हंगामात लीग टप्प्यात 14 सामन्यांत 9 विजय, 3 पराभव आणि 20 गुणांसह पहिले स्थान पटकावले. तर दुसरीकडे राजस्थानलाही केवळ एक गुण मिळाल्याने त्याचेही हैदराबादच्या बरोबरीचे 17 गुण झाले. पण, चांगल्या नेट रनरेटमुळे हैदराबाद दुसऱ्या स्थानावर राहिले.
नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम खेळपट्टी अहवाल..
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या क्वालिफायर-1 सामन्याच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, येथे फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळतो, जरी येथील शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. अहमदाबादच्या या स्टेडियममध्ये आतापर्यंत 32 आयपीएल सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 14 वेळा विजय मिळवला आहे, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला 18 वेळा विजय मिळवण्यात यश आले आहे. येथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 171 ते 180 धावांच्या आसपास असल्याचे दिसून आले आहे. या आयपीएल 2024 हंगामात आतापर्यंत येथे 6 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 2 जिंकले आहेत, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 4 वेळा सामना जिंकण्यात यश मिळवले आहे.
केकेआरला फिल सॉल्टची भासेल उणीव…
केकेआरला त्यांचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा आणि यष्टीरक्षक फिल सॉल्ट (435 धावा) याच्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढावी लागेल, जो टी20 विश्वचषकापूर्वी राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला परतला आहे. सॉल्टने अव्वल क्रमवारीत सुनील नारायण (461 धावा) सोबत मजबूत भागीदारी केली. कर्णधार श्रेयस अय्यरची (287 धावा) निराशाजनक कामगिरी असूनही, केकेआरला या मोसमात नारायण आणि सॉल्टच्या तुफानी फलंदाजीचा टाॅप आॅर्डरमध्ये फायदा झाला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात केकेआरला बदली सलामीवीर म्हणून नरेनसोबत रहमानुल्ला गुरबाजची चाचणी घेण्याची संधी मिळाली नाही, ज्यामुळे काही चिंता दूर झाल्या असत्या. केकेआरसाठी, नितीश राणाचा फॉर्म मधल्या फळीला अतिरिक्त स्थिरता प्रदान करतो, तर आक्रमक आंद्रे रसेल फिनिशर म्हणून महत्त्वाचा असेल.
केकेआरप्रमाणेच एसआरएचचे सलामीवीरही आहेत धडाकेबाज…
आयपीएल 2024 मध्ये केकेआरच्या सलामीच्या फलंदाजांनी बॅटने आग लावली. त्याचप्रमाणे सनरायझर्स हैदराबादकडेही दोन घातक सलामीवीर आहेत. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी या आयपीएलमध्ये डावाची सुरुवात करताना विरोधी गोलंदाजांची झोप उडवली. हेडने या मोसमात 1 शतकाच्या जोरावर 533 धावा केल्या आहेत. हेडच्या झंझावाती फलंदाजीचा फायदा अभिषेकलाही झाला आणि त्याने या मोसमात 41 षटकार ठोकले, जे गेल्या 6 हंगामातील त्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 10 अधिक आहे. अभिषेकने यंदा 467 धावा केल्या आहेत.
केकेआरची ताकद फिरकी गोलंदाजी…
केकेआरच्या गोलंदाजी आक्रमणात मिशेल स्टार्कच्या नेतृत्वाखाली त्यांच्या वेगवान गोलंदाजांना पाठिंबा देणारी मजबूत फिरकी फळी आहे, तर कर्णधार पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली हैदराबादच्या वेगवान आक्रमणाने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. या मोसमाच्या सुरुवातीच्या त्यांच्या एकमेव सामन्यात KKR ने एका उच्च-स्कोअरिंग सामन्यात हैदराबादचा चार धावांनी पराभव केला आणि एक रोमांचक प्लेऑफ चकमकीचा टप्पा निश्चित केला. कोलकात्याच्या वरूण चक्रवर्तीने यंदाच्या मोसमात 13 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत तर दुसरीकडे हैदराबादच्या टी. नटराजन याने 11 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत.