न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्राच्या महिलांच्या स्थितीबाबतच्या आयोगातून आज इराणला बाहेर काढण्यात आले. माहसा आमिनीच्या मृत्यूनंतर पेटलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इराणला या आयोगाच्या सदस्यत्वावरून बाहेर काढण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राच्या महिलांच्या स्थितीबाबत झालेल्या मतदानानुसार 29 विरुद्ध 8 मतांनी इराणला बाहेर काढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तर 16 देश या ठरावावरील मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहिले.
निकाराग्वा, नायजेरिया, ओमान, बोलिव्हिया, चीन, कझाकिस्तान, रशिया आणि झिम्बाब्वे या देशांनी इराणविरोधातील या ठरावाच्या वेळी इराणच्या बाजूने मतदान केले. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या 54 सदस्यांसमोर हा ठराव मांडण्यात आला होता.
या परिषदेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या या ठरावानुसार महिलांच्या स्थितीबाबतच्या आयोगावरून इराणला तत्काळ हटवण्यात आले. इराणच्या सदस्यत्वाची मुदत 2022 ते 2026 पर्यंत होती. उर्वरित सर्व कालावधीसाठी इराणला या आयोगाच्या सदस्यत्वावरून हटवण्यात आले आहे.
US : ‘गोल्डन गेट ब्रिज’वरुन समुद्रात उडी, भारतीय वंशाच्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल
माहसा आमिनीचा मृत्यू देशाच्या नैतिक सुरक्षा रक्षकांच्या कोठडीत सप्टेंबर महिन्यात झाला होता. तेव्हापासून सुरू झालेले आंदोलन गेल्या 12 आठवड्यांपासून तेथे सुरू आहे. माहसा आमिनीच्या मृत्यूमुळे इराणमधील महिलांची स्थिती किती वाईट आहे, हे अधोरेखित झाले आहे. आता ही दडपशाही आणि हिंसाचार सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश इराणमधील जनतेने आंदोलनाच्या माध्यमातून दिला आहे, असे ब्रिटन, अमेरिका, चेक प्रजासत्ताक आणि युरोपीय संघाच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.