न्यूयॉर्क – अमेरिकेत आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजवरून (Indian American Teen Dies After Jumping From Golden Gate Bridge) भारतीय वंशाच्या एका अमेरिकन तरुणाने समुद्रात उडी मारली. यामुळे त्याचा मृत्यू झाला. पुलावर तैनात असलेल्या अमेरिकी कोस्ट गार्डच्या जवानांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर या मुलाचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढला. मुलाच्या नातेवाईकांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
गोल्डन गेट ब्रिज सॅन फ्रान्सिस्को खाडीचे दोन टोक आणि अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहराला जोडतो. या मुलाने हे पाऊल कशामुळे उचलले हे अद्याप समजू शकले नसले तरी त्याने आत्महत्या केल्याची शक्यता आहे.
तटरक्षक दलाने सांगितले की, पुलाजवळ 16 वर्षीय भारतीय वंशाच्या तरुणाची सायकल, फोन आणि बॅग सापडली आहे. दुपारी 4.58 च्या सुमारास त्याने पुलावरून उडी मारली.
यूएस स्थित एनजीओ ब्रिज रेल फाउंडेशनच्या मते, गेल्या वर्षी येथे 25 लोकांनी आत्महत्या केली.
1937 मध्ये पूल सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 2,000 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. सॅन फ्रान्सिस्कोच्या या जगप्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिजवर आत्महत्या रोखण्यासाठी ही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे.