भोर – भोर शहरातील शेटेवाडी चौपाटी येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास दैनंदिन पुष्पहार आणि पूजन करण्याचा संकल्प करून शहरासह तालुक्यातील शिवप्रेमी मावळ्यांनी प्रत्यक्षात याचा शुभारंभ केला आहे.
छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भोरच्या भूमीत शहरातील शेटेवाडी चौपाटी हे शिवतीर्थ म्हणून ओळखले जात असून, राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी महाराजांचा अश्वारूढ पुतळा 1999 साली उभारला आहे.
भोर शहराच्या वैभवात यामुळे भर पडली आहे. प्रतिवर्षी शिवजयंतीच्या वेळी अनेक शिवप्रेमी मावळे चौपटी येथे येऊन महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतात. शहरातील शिवप्रेमी दर पौर्णिमेला आणि आमावस्येला महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आले आहेत.
मात्र, भोर शहरातील शिलेदार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश महांगरे यांनी पुतळ्याला रोज पुष्पहार घालण्याची संकल्पना मांडली. त्यास शिवप्रेमींनी पाठिंबा दिला असून, यासाठी शुभम शेटे, शाहु डाळ, सचिन देशमुख, ओंकार बहिरट, सुनील जगताप, धीरज जेधे, रोहन शेटे,
रोहित देशमाने व रोहिडा शिवजयंती उत्सव समितीने पुढाकार घेतला आणि त्यासाठी शिवप्रेमी मावळ्यांनी मदतीचा हात पुढे केल्याने या संकल्पाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले असल्याचे राजेश महांगरे यांनी सांगितले. दरम्यान शिवप्रेमी मावळ्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे चौपाटी येथील पुतळा परिसराची दैनंदिन साफसफाई आणि स्वच्छता होत आहे.