नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी संसदेत देशातील रस्त्यांचा रोडमॅप मांडला. लोकसभेत ते म्हणाले की, 2024 पर्यंत देशातील रस्ते पायाभूत सुविधा अमेरिकेच्या बरोबरीने असतील. रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ केल्यास शेतीबरोबरच पर्यटनातही रोजगाराच्या संधी वाढतील. तसेच त्यांच्या विभागाने चार विश्वविक्रम केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या चार विश्वविक्रमांची माहिती देताना गडकरी म्हणाले, आमच्या विभागाने चार विश्वविक्रम केले आहेत देशासाठी आम्हाला याचा अभिमान आहे. पहिला जागतिक विक्रम म्हणजे कोविडच्या काळात एका दिवसात 38 किमी रस्ता बांधला. तसेच एक आठवड्यापूर्वी आम्ही 50 किमी लांबीचा सिंगल लेन रस्ता अवघ्या 100 तासांत बांधला. हा विक्रम गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यात दिल्ली-वडोदरा ग्रीनफिल्ड अलाइनमेंटवर घडला. आम्ही वडोदराजवळ चार लेनचा 2.5 किलोमीटर लांबीचा सिमेंट काँक्रीट रस्ता अवघ्या 24 तासांत बांधला. नंतर NH 52 वर सोलापूर ते विजापूर दरम्यान 26 किमीचा सिंगल लेन रस्ता अवघ्या 21 तासांत बांधला. गडकरी म्हणाले, मला आनंद आहे की कंत्राटदाराच्या तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे.
नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले की, राष्ट्रीय राजधानीत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी 62,000 कोटी रुपयांचे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. 2022-23 च्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील लोकसभेत चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले की पूर्वी जेव्हा ते दिल्लीत यायचे तेव्हा धौला कुआन येथे ट्रॅफिकमध्ये अडकायचे.
2019 मध्ये, गडकरींनी दिल्लीहून विमानतळ आणि गुरुग्रामकडे जाणारी वाहतूक सुलभ करण्यासाठी दिल्लीतील धौला कुआंजवळील परेड रोड जंक्शन येथे तीन-लेन अंडरपासचे उद्घाटन केले होते. ते म्हणाले, “आम्ही प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. माझा विभाग 62,000 कोटी रुपये फक्त दिल्लीच्या प्रदूषणाचा सामना करण्यासाठी खर्च करत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही रिंगरोड आणि इतर रस्ते बांधले.”, असेही गडकरी म्हणाले.