पुणे – शिक्षणाचे माहेरघर म्हणवणाऱ्या आणि पुरोगामित्त्वाचे ढोल बडवणाऱ्या पुण्यात लग्नव्यवस्था ही कायदाबाह्य ठरल्याचे एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. पुण्यात 24 टक्के विवाहांमध्ये वधूचे वय 18 पेक्षा कमी असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय आरोग्य विभागाच्या पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून मिळाली आहे.
शिक्षण, स्त्रियांच्या हक्कांविषयीची, स्त्रियांच्या शिक्षणाविषयीची चळवळ पुण्यातूनच सुरू झाली. मुलींच्या पहिल्या शाळेची मुहूर्तमेढ पुण्यातच रोवली गेली, अशा या पुण्यात स्त्रियांविषयीच्या विषयाचे मागासलेपण या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. एकूण लग्नांपैकी 24 टक्के लग्नांमध्ये मुलींचे वय 18 पेक्षा कमी असतेच याशिवाय 15 ते 19 वयोगटातील 5.5 टक्के मुली या गर्भवती झाल्या आहेत किंवा आधीच एका बाळाच्या आई आहेत, हे देखील या निरीक्षणातून समोर आले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून पाच वर्षांतून एकदा राज्य, केंद्रशासित प्रदेश, जिल्हे या ठिकाणच्या कुटुंबातील महिला, मुले आणि पुरूष यांचे आरोग्य, पोषण, लसीकरण अशा विविध प्रकारच्या निकषांवर सर्वेक्षण केले जाते. प्रातिनिधीक स्वरूपात काही कुटुंबांचे सर्वेक्षण केल्यानंतर ही बाब पुढे आली आहे. या सर्वेक्षणात आरोग्याचा निर्देशांक, सुधारणा आणि पाच वर्षांतील त्याचा “ट्रेंड’ याची माहिती मिळते.
“भारतीय आरोग्य व्यवस्थापन संशोधन’ (आयआयएचएमआर) या संस्थेने पुण्यात जून ते डिसेंबर 2019 या कालावधीत सर्वेक्षण केले. यामध्ये पुण्यात 786 घरांमधील 832 महिला आणि 140 पुरुषांकडून माहिती गोळा केली गेली. या माहितीचे विश्लेषण करण्यात आले आणि त्याद्वारे प्रातिनिधीक स्वरूपात ही माहिती समोर आली आहे.
गेल्या पाच वर्षांत बालविवाहमध्ये पॉइंट पाचने (.5) वाढ झाल्याचेही दिसून आले आहे; तर, अल्पवयातच गर्भवती राहण्याचे प्रमाण पाच वर्षांत दोन टक्क्यांनी वाढल्याचेही दिसून आले आहे. जे आधी 3.3 टक्के होते ते आता 5.5 टक्के झाल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे.