दुर्दैवी वाद

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या चुलत भावंडांमधील राजकीय वादाचे एक विचित्र स्वरूप काल मतदानाच्या आदल्या दिवशी महाराष्ट्राला पहायला मिळाले. एकाच घरातील या भावंडांमध्ये अशा पातळीवर गेलेल्या वादंगातून राजकारणाचा सध्याचा स्तर किती भीषण पातळीवर गेला आहे याचे दर्शन झाले. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मतदार संघातील एका गावात केलेल्या भाषणाची व्हिडिओ क्‍लीप आक्षेपार्ह भाषेतील आहे. आणि त्यात त्यांनी आपल्या भगिनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात अत्यंत चुकीची भाषा वापरली आहे, असे त्यात ध्वनीत होत आहे.

तथापि आपले हे वक्‍तव्य एडिट करून वापरले गेले आहे, आपल्या स्वतःच्या भगिनीविषयी आपण अशी भाषा वापरणे कदापिही शक्‍य नाही, असा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे. या व्हिडिओ क्‍लीप प्रकरणाच्या मुळाशी आपण आता जाणार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी भाजप सोशल मीडिया टीमच्या विरोधात गुन्हाही दाखल केला आहे. तसेच तिकडे भाजपच्या वतीनेही धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

मतदानाच्या आदल्या दिवशी दोन भावंडांमधील या वादामुळे टीव्ही वाहिन्यांनाही चमचमीत खाद्य मिळाले आणि त्यांनीही हा विषय जोरदारपणे लावून धरला. मतदानाला केवळ काही तास उरले असताना राज्याच्या राजकारणाला यातून वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न झाला. महिला आयोगानेही या प्रकरणात तातडीने दखल घेताना धनंजय मुंडे यांना नोटीस बजावण्याचीही घोषणा केली. या साऱ्या प्रकरणावर स्वतः धनंजय मुंडे यांनीही पत्रकार परिषद घेत आता आपल्याला जगावेसेच वाटत नाही अशी प्रतिक्रिया देताना आपल्या अश्रूंना वाट करून दिली.

त्या पत्रकार परिषदेचीही बातमी गाजली. काल या घटना इतक्‍या वेगाने घडल्या आणि त्याला इतक्‍या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली की गेले काही दिवस सुरू असलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीतील सारे मुद्दे एका रात्रीच बाजूला पडले आणि मुंडे भावंडांच्या प्रकरणाने साऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीवर कब्जा केल्याचे वातावरण तयार झाले. हा निवडणुकांचा माहोल आहे. यात आता आयत्यावेळी निवडणुकीला कलाटणी देण्यासाठीचे विविध फंडे वापरण्याचे एक नवीन तंत्र विकसित होऊ लागले आहे. प्रगत मोबाइल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियामुळे हे वातावरण फिरवण्याचे तंत्र फारच सोपे झाले आहे. व्हायरल व्हिडिओ क्‍लीप हा यातला परवलीचा शब्द झाला आहे. त्यातच कोणाचेही वक्‍तव्य कसेही एडिट करून अर्थाचा अनर्थ करून ते प्रसारित करण्याचे काम एखादी पोरसवदा व्यक्‍तीही चुटकीसरशी करू शकते, इतके हे सोपे तंत्रज्ञान आहे.

त्यातच आता राजकीय पक्षांनी संघटितपणे सोशल मीडिया तज्ज्ञांची पथकेच आपल्या पदरी बाळगल्याने अर्थाचा अनर्थ करणाऱ्या व्हिडिओ क्‍लीप तयार करणे आणि त्या सोशल मीडियावर व्हायरल करणे हा रोजचाच खेळ झाला आहे. सायबर सेलची किंवा पोलिसांची यंत्रणा या प्रकाराला आळा घालण्यात कुचकामी ठरत आहे. या तंत्रज्ञान विश्‍वाचा पसाराच इतका अफाट आहे की त्याला ही सरकारी यंत्रणा पुरी पडणे अशक्‍य आहे. हे सारे जरी खरे असले तरी शेवटी आपण एकाच घरातील आहोत, गोपीनाथ मुंडे या स्वर्गीय लोकनेत्याच्या घराचा वारसा सांगणाऱ्यांपैकी आहोत याचे भान मुंडे भावंडांनी सोडायला नको होते.

धनंजय मुंडे यांची ही कथित व्हिडिओ क्‍लीप अगदी समजा खरी असेल तरी त्यावर धनंजय मुंडे यांनी दिलेली प्रामाणिक प्रतिक्रिया लक्षात घेऊन पंकजा मुंडे यांनी हा विषय तेथेच संपवायला हवा होता. आपला भाऊ आपल्या विषयीची इतक्‍या खालच्या दर्जाची विधाने करू शकणार नाही अशी भूमिका घेऊन त्यांनी हा वाद वाढवला नसता तर अधिक चांगले झाले असते. पण पंकजांनीही या प्रकरणाला मोठीच हवा देताना आपल्याला धनंजय मुंडे यांच्या खोटेपणाचा कंटाळा आला आहे, असे म्हणत त्यांच्यावर पलटवार केला. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर धनंजय मुंडे यांचे पाठीराखेही हिरिरीने सोशल मीडियावर त्यांची बाजू घेण्यासाठी पुढे सरसावले. त्यांनी मागच्या एका घटनेचा दाखला त्यात दिला आहे.

धनंजय मुंडे यांचे समर्थक असे म्हणतात की, मागे एकदा सुरेश धस नावाच्या एका नेत्याने, पंकजांनी आता पायात घुंगरू बांधून नाचायला उतरावे, असे आक्षेपार्ह विधान केल्यानंतर तिथल्या तिथे धनंजय मुंडे यांनी त्यांना चपराक दिली होती. आपल्या बहिणीविषयी असले आक्षेपार्ह उद्‌गार सहन केले जाणार नाहीत, असे धनंजय मुंडे यांनी त्यांना त्यावेळी जाहीरपणे बजावले होते असा दाखलाही दिला गेला होता. अशाच स्वरूपाची भूमिका यावेळी पंकजांनाही घेता आली नसती काय असा प्रश्‍न कोणीही उपस्थित करू शकतो. पण हा विषय तिथल्यातिथे संपवण्यात कोणालाही रस नव्हता. उलट त्याला हवा देण्याचाच प्रयत्न झाला.

हे प्रकरण पाहता यापुढील निवडणुकांच्या राजकारणाची दिशा आता कोणत्या स्तराला जाईल याचा अंदाज बांधता येणे अवघड होऊन बसले आहे. विविध राजकीय पक्ष आता आपले इलेक्‍शन हत्यार म्हणून सोशल मीडिया टीमची पथके पदरी बांधून ठेवू लागली आहेत. राजकीय पक्षांचे आयटीसेल सध्याच्या राजकीय वातावरणात धुमाकुळ घालताना दिसत आहेत. राहुल गांधी यांच्या सारख्या नेत्यांनाही या सोशल मीडिया टीमचा सर्वात मोठा फटका बसला आहे. त्यांची अनेक साधी वक्‍तव्ये मोडतोड करून किंवा जुळवाजुळवी करून मोठ्या प्रमाणावर प्रसारित केली गेली. हा सारा एडिटींगचा मामला असतो हे लोकांच्या लक्षात येईपर्यंत संबंधित नेत्याचे मोठ्या प्रमाणात चारित्र्य हनन झालेले असते. एखादी व्हायरल क्‍लीप कोणालाही राजकीय आयुष्यातून उठवण्यासाठी पुरेशी ठरू लागली आहे. त्यामुळे आता लोकांनीच सावध राहण्याची वेळ आली आहे. अशा प्रकारांना हवा न देता किंवा स्वतःचे मत कलुषित न होऊ देता सद्‌सदविवेक बुद्धी टिकवून ठेवण्याचे कसब आता सामान्य नागरिकांनी शिकून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण्यांनीही अशा प्रकरणांत वातावरण कलुषित होणार नाही याचीही दक्षता घेण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.