सियाचीन पर्यटकांसाठी खुले – राजनाथ सिंह

लडाख – जगातील सर्वांत उंचावरील युदधभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशरचा भाग हा पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी याची अधिकृत घोषणा केली. सियाचीन बेस कॅम्प ते कुमार पोस्टपर्यंतचा सर्व भाग हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

लडाखमधील श्‍योक नदीवरील कर्नल चेवांग रिंचेन पुलाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. राजनाथ म्हणाले, लडाखमध्ये पर्यटनासाठी प्रचंड वाव आहे. लडाखमधील उत्तम कनेक्‍टिव्हीटी पर्यटकांना नक्कीच मोठ्या संख्येने इकडे खेचून घेऊन येईल. हा नवा पूल सर्व प्रकारच्या वातावरणातील बदलातही या भागाला जोडून ठेवेल. तसेच सीमाभागात एक मोक्‍याची जागा म्हणून तो नावारुपाला येईल.

भारत-चीन संबंधांवर राजनाथ म्हणाले, भारताने चीनसोबत सहकार्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत. येथे फक्त दोन्ही देशांच्या दृष्टीकोनात फरक आहे. दोन्ही देशांमध्ये सीमेवरुन वाद आहेत. मात्र, हे वाद योग्य समज आणि जबाबदारीने हाताळले जात आहेत.

काश्‍मीर हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे चीननेही मान्य केले आहे त्यामुळेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी काश्‍मीरचा विषय काढला नाही, असेही यावेळी राजनाथ सिंह म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.