दोन दुचाकीस्वारांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

पिंपरी  -भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 21) पहाटे बावधन येथे घडली.

रविराज सत्यनारायण प्रसाद (वय 22) आणि विकीकुमार भगवान रॉय (वय 23, दोघेही रा. सुतार हॉस्पिटलजवळ, कोथरूड, पुणे) अशी मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणांची नावे आहेत. याबाबत मयत रविराज याचे वडील सत्यनारायण भोजलमहतो प्रसाद (वय 48, पटना, बिहार) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शुक्रवारी पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास फिर्यादी यांचा मुलगा रविराज आणि त्याचा मित्र विकीकुमार हे दोघेजण दुचाकीवरून चालले होते. ते बावधन येथे आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील दोघांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच अपघाताची खबर न देता पळून गेला. हिंजवडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक आनंद पगारे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.