कारवाई करूनही बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर सुरूच

पिंपरी -प्लॅस्टिक पिशवी वापरण्यास बंदी आहे. तरी शहरात चोरून चोरून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर व्यावसायिकांकडून होत आहे. त्याला पाबंद बसण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दररोज वेगवेगळ्या भागांतील दुकानाची तपासणी करण्यात येत आहे. दररोज अनेक दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करूनही शहरात पूर्णतः प्लॅस्टिकबंदी होताना दिसत नाही. अनेक व्यावसायिक बिनधास्थपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे.

प्लॅस्टिकबंदी कायदा लागू झाल्यापासून पिंपरी-चिंचवड शहरात शंभर टक्के प्लॅस्टिकबंदी व्हावी यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी शहरातील छोट्या, मोठ्या व्यावसायिकांनाही अनेकदा प्लॅस्टिक वापरण्यापासून परावृत्त करण्याचे वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढविल्या आहेत. प्लॅस्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी प्रभागनिहाय पथकाची स्थापनाही करण्यात आली आहे. या पथकाकडून त्या त्या भागातील दुकानाची अचानक तपासणी करण्यात येते. व त्यांच्याकडे प्लॅस्टिक आढळल्यास दंड आकरण्यात येतो.

आज महापालिकेच्या “ग’ क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्र. 24 मधील आरोग्य विभागाच्या पथकाने डांगे चौक, वाकड रोडवरील दुकानाची अचानक तपासणी केली. त्या वेळी एका हॉटेल चालकाकडे दोन किलो गार्बेज प्लॅस्टिक आढळल्याने त्याला पाच हजार रुपयाचा दंड आकरण्यात आला आहे. हे प्लॅस्टिक पंचनामा करून अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

प्रत्येक महिन्याला शहरातील शेकडो दुकानाची तपासणी करून लाखो रुपयांचा दंड वसूल केल्यानंतरही दररोज अनेक ठिकाणी प्लॅस्टिकचा सर्रास वापर होत असल्याचे उघड होत असल्यामुळे आता व्यावसायिकांवर कारवाई करण्यासोबतच प्लॅस्टिक पुरविणाऱ्यांवरही छापे मारून त्यांच्यावर खटले दाखल करावेत, अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांतून होऊ लागली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.