नाव न घेता उपमुख्यमंत्री पवार यांना आमदार लक्ष्मण जगताप यांचे आव्हान

पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. गेल्या तीन वर्षांत कारभार करताना भाजपाने कोणताही घोटाळा केलेला नाही अथवा चुकीच्या कामांना पाठीशी घातले नाही. त्यामुळे केवळ भाजपाच्या तीन वर्षांची नव्हे तर त्यांच्याही काळातील तीस वर्षांच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करा, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत, असे आव्हानच पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते तथा भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता पत्रकार परिषदेत दिले.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलनासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, एकनाथ पवार, सदाशिव खाडे, अमित गोरखे, उमा खापरे, शैला मोळके, सीमा सावळे, अमोल थोरात, बाबू नायर आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

महापालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात एका प्रश्‍नाला उत्तर देताना जगताप यांनी वरील आव्हान दिले. पुढे बोलताना ते म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. गेल्या तीन वर्षांच्या काळात चुकीची कामे आम्ही केलेली नाहीत. पालिकेत एकही घोटाळा भाजपा पदाधिकारी अथवा नगरसेवकाने केलेला नाही. आम्ही सत्ता येताच ऑनलाइन निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. त्यामुळे निविदा भरण्यास राज्यभरातून ठेकेदार सहभागी होत आहेत.

जिथे आम्हाला शंका येईल, त्या कामांची चौकशी करण्याबाबत आयुक्तांना मी स्वतः पत्र दिली आहेत. कोणत्याही घोटाळ्याशी भाजपा पदाधिकाऱ्यांचा संबंध नाही. आम्ही अनधिकृत कोणतेही काम केले नाही. संपूर्ण निविदा प्रक्रिया कामकाज प्रशासन राबवत असून, अटी-शर्थी देखील तेच टाकत असतात. त्यामुळे कुठल्याही निविदा प्रक्रियेची चौकशी करा, तसेच पालिकेच्या तीन वर्षांची काय तर संपूर्ण तीस वर्षांची चौकशी करा, चौकशीला आम्ही सामोरे जाण्यास तयार असल्याचे जगताप म्हणाले.

पालिकेतील प्रश्‍नांना बगल
पालिकेतील भ्रष्टाचार, अनागोंदी, रिंग याबाबत पत्रकारांनी प्रश्‍न विचारण्याचा प्रयत्न केला असता आजची पत्रकार परिषद ही आंदोलनासंदर्भात असल्याचे सांगत प्रश्‍नांची उत्तरे देण्याची आजी, माजी अध्यक्ष तथा दोन्ही आमदारांनी टाळले. तर राज्यात भाजपाच्या पाच वर्षांच्या काळातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था तसेच उत्तर प्रदेशातील भाजपा आमदाराने तरुणीवर केलेल्या अत्याचाराच्या विषयालाही बगल देण्यात आली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.