पिंपरी- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी करोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी (18 मे) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाला करोनाची लागण झाली होती. या सहाय्यक निरीक्षकांच्या संपर्कात आल्याने एक पोलीस निरीक्षक आणि चार कर्मचाऱ्यांना करोना झाल्याचा अहवाल बुधवारी (दि. २०) प्राप्त झाला.
तर यापूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस कर्मचाऱ्याला 15 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. आतापर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस करोनापासून कोसो दूर होते. मात्र आत्ता सात जणांना बाधा झाल्याने पिंपरी चिंचवड पोलीस दलात आता करोनाने जोरदार मुसंडी मारल्याचे बोलले जात आहे.