भूमिगत वीजवाहिनीचा स्फोट; महिला गंभीर जखमी

पुणे – पदपथाची कामे तसेच शहरातील वीज वाहिन्या भूमिगत करताना अनेक ठिकाणी त्या जमिनीवर आलेल्या आहेत. या वाहिन्यांवर असलेले सुरक्षा कवच अनेक ठिकाणी झिजलेले असल्याने अशा वाहिन्या नागरिकांच्या जीवावर उठल्या असल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. एरंडवण्यातील हॉटेल अभिषेक समोर असलेल्या पदपथावरील वीज वाहिनीचा स्फोट होऊन महिला गंभीर जमखी झाल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. सरिता गोपाळकृष्ण नायर असे या महिलेचे नाव असून या स्फोटात सरिता यांचे दोन्ही पाय आणि हात भाजले असून तिच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सरिता या आपल्या पतीसोबत सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हॉटेल अभिषेक समोरील पदपथावरून जात असताना, जमिनीवर असलेल्या महावितरणच्या केबलवर त्यांचा पाय पडला. त्यानंतर मोठा स्फोट झाला. या स्फोटात त्यांचे दोन्ही पाय तसेच हात भाजले तर या स्फोटाने त्या खाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्‍यालाही भाजले आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने स्थानिक नागरिक तसेच त्यांच्या पतीने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून ही माहिती पोलिसांना कळविण्यात आली.

“खर्च आम्ही करतो; पण केबल भूमीगत करा’
महापालिकेच्या पदपथावर हा प्रकार घडला असल्याने महापालिकेच्या विद्युत विभागाकडून ही बाब गांभीर्याने घेण्यात आली आहे. शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे भूमीगत केबर पदपथावर आलेल्या असल्याने तसेच सततची वर्दळ आणि वाहनांच्या वर्दळीने अनेक ठिकाणी या केबलचे सुरक्षा अवरण खराब झाले आहे. त्यामुळे या धोकादायक केबल तातडीने भूमीगत करण्यात याव्यात यासाठी महापालिकेकडून महावितरणला पत्र पाठविण्यात येणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी दिली. तसेच, महावितरणकडे निधी नसल्यास आम्ही स्वखर्चाने हे काम करून देऊ मात्र, शहरातील नागरिकांच्या जिवाशी खेळू नये, असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.