पुणे – एस. ई. सोसायटीच्या एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित अखिल भारतीय 16 वर्षांखालील मुलांच्या हॉकी स्पर्धेसाठी दिल्या जाणाऱ्या रोख रकमेच्या पारितोषिकात यावर्षी भरपूर वाढ करण्यात आली असल्याची घोषणा एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व आयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.
डॉ. भोसले म्हणाल्या, हॉकी खेळाचा प्रसार व्हावा व उत्कृष्ट खेळाडू मिळावेत, हाच आमचा प्रमुख उद्देश आहे. यावर्षीच्या स्पर्धेसाठी आम्ही विजेत्यांसाठी 2.80 लाख रुपये देण्यात येणार आहेत. गत स्पर्धेत आम्ही 1.45 लाख रुपयांची पारितोषिके दिली होती. यावेळी त्या रकमेत 1.35 लाख रुपयांची भरघोस वाढ केली आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. या पारितोषिकाच्या रकमेत मुलांच्या स्पर्धेबरोबरच होत असलेल्या राज्यस्तरीय महिलांच्या हॉकी स्पर्धेचासुद्धा समावेश आहे.
या स्पर्धेला भारतामध्ये वयोगटातील एक महत्त्वाची स्पर्धा मानली जाते. हॉकी इंडियाच्या वार्षिक स्पर्धा कार्यक्रमात या 16 वर्षांखालील स्पर्धेचा समावेश केला गेला आहे. महत्त्वाचे म्हणजे वयोगटातील ही एकमेव रोख पारितोषिकाची स्पर्धा आहे. स्पर्धा 9 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील हॉकी मैदानावर ही स्पर्धा 9 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. महिलांची स्पर्धा बाद पद्धतीने होणार आहे.
विजेता संघ होणार लखपती
मुलांच्या विजेत्या संघाला रोख 1 लाख, उपविजेत्याला 50 हजार व तृतीय क्रमांकासाठी 30 हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. महिलांच्या राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्याला 50 हजार, उपविजेत्याला 30 हजार व तृतीय क्रमांकासाठी 20 हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेमध्ये सर्व मिळून 34 लढती होतील.