अबुधाबी – फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात पाकिस्तानने अफलातून कामगिरी करत टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील सुपर 12 फेरीच्या सामन्यात नामिबियावर 45 धावांनी विजय प्राप्त केला.
पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाचा डाव 20 षटकांत 5 बाद 144 धावांवर रोखला गेला. त्यांच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. संघाच्या केवळ 8 धावा झालेल्या असताना त्यांचा सलामीवीर मायकल लिंगेन बाद झाला. त्यानंतर स्टिफन बार्ड व क्रेग विल्यम्स यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. बार्ड 29, तर विल्यम्स 40 धावांवर बाद झाले. त्यानंतर कर्णधार गेरहार्ड इरासम व डेव्हिड विसे यांनी चांगली लढत दिली. मात्र, इरासम बाद झाल्यावर जेजे स्मिथनेही निराशा केली. जेन एटनने विसेला साथ देत धावफलक हलता ठेवला. मात्र, त्यांचा अनुभव कमी पडला.
कर्णधार बाबर आझम व महंमद रिझवान यांच्या फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने नामिबियासमोर विजयासाठी 190 धावा करण्याचे आव्हान ठेवले. कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानेच रिझवानसह संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. या जोडीने शतकी सलामी दिली. कर्णधार आझमने थाटात अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 70 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 49 चेंडूत 7 चौकार फटकावले. दुसरीकडे रिझवाननेही आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. फखर झमानने निराशा केली. मात्र, महंमद हाफीजने रिझवानला साथ देत संघाचे दीडशतक फलकावर लावले. त्याने 16 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 32 धावांची खेळी करत रिझवानला सुरेख साथ दिली.
रिझवानने अर्धशतक पूर्ण झाल्यावर फटकेबाजी सुरू केली. डावातील 19 वे षटक संपले तेव्हा पाकिस्तानच्या 2 बाद 165 धावा होत्या. मात्र, अखेरच्या षटकात रिझवानने अफलातून फटकेबाजी करत या एकाच षटकात तब्बल 24 धावा वसूल केल्या. त्यात त्याने 4 चौकार व 1 षटकार अशी आतषबाजी केली. त्याने अखेरच्या दोन धावा धावून पूर्ण केल्या व संघाला 20 षटकांत 2 बाद 189 धावा अशी मोठी मजल मारून दिली. रिझवानने 79 धावांच्या नाबाद खेळीत 50 चेंडूत 8 चौकार व 4 षटकार फटकावले.