समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – तालुक्यातील छत्रपती शिवाजी खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दुसऱ्या फळीतील नेतेमंडळी सक्रिय झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज (दि. 30) प्रमुख नेतेमंडळींसोबत बैठकांचा सिलसिला सुरू होता. दरम्यान, निवडणूक बिनविरोध झाल्यास कार्यकर्त्यांऐवजी दुसऱ्या फळीतील नेतेमंडळीच संघावर जाण्याची शक्यता अधिक दिसत आहे.
संघाच्या तेरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत उद्या (दि. 31) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. अद्यापपर्यंत एकही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने दाखल झालेले 148 अर्ज कायम आहेत. खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा आणि जिल्हा बॅंकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. त्या अनुषंगाने नाहाटा-पानसरे यांनी आज (सोमवार) दुपारी माजी आ. राहुल जगताप, कॉंग्रेस नेते राजेंद्र नागवडे, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस यांची बैठक घडवून आणली. त्यानंतर नाहाटा-पानसरे ही जोडगोळी आ. बबनराव पाचपुते यांच्याकडे दाखल झाली.
या बैठकीला ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते, अरुण पाचपुते, वैभव पाचपुते, पोपटराव खेतमाळीस आदी उपस्थित होते.
आ. पाचपुते, जगताप आणि नागवडे या तिन्ही नेत्यांचे समाधान होईल असे जागावाटप करण्याचे पहिले आव्हान या दुसऱ्या फळीतील नेत्यांसमोर असणार आहे. त्यातच संघाच्या तेरा जागांसाठी जवळपास दीडशे इच्छुक आहेत. निवडणूक बिनविरोध करायची झाल्यास माघारीसाठी नेत्यांना अनेकांची मनधरणी करावी लागणार आहे.
त्यातही माजी सभापती द्वयी, अर्चना पानसरे, अरुण पाचपुते, लक्ष्मण नलगे, दीपक भोसले, विश्वास थोरात आदी नेतेमंडळींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाल्यास प्रमुख नेतेमंडळी या दुसऱ्या फळीतील नेतेमंडळींना संघावर घेणार की त्यांना डावलून कार्यकर्त्यांना संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
खरेदी- विक्री संघासह यापुढील सर्व निवडणुका कार्यकर्त्यांसाठी लढणार आहोत. कार्यकर्त्यांच्या सोयीचा निर्णय घेणार आहे.
– बबनराव पाचपुते, आमदार
संघाच्या निवडणुकीत आमचे नेते अजित पवार यांच्या आदेशाचे पालन करणार आहोत. त्यादृष्टीने चर्चा सुरू आहे.
– राहुल जगताप, माजी आमदार
अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. जागावाटप समाधानकारक झाल्यास निवडणूक बिनविरोध करण्याबाबत विचार करू.
– राजेंद्र नागवडे, कॉंग्रेस नेते